मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली आहे. सोनाली कुलकर्णीने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. सोनालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर नुकतंच तिने एका मुलाखतीत सोनालीने तिच्या लग्नाबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, “आम्ही करोनामुळे रजिस्टर लग्न केलं होतं. मी दुबईत अडकले होते. पण लग्नाच्या नोंदणीशिवाय मी तिथे जास्त काळ राहू शकले नसते. त्यामुळेच आम्ही रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यावेळी लग्नाचे विधी करु शकलो नाही. तसेच आमचे कुटुंबिय तेव्हा उपस्थित नव्हते.”
“त्यामुळेच आम्ही गेल्या महिन्यात लंडनमध्ये कुटुंबिय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केले. पण या लग्नाचे काहीही फोटो किंवा व्हिडीओ अद्याप समोर आलेले नाहीत. मला सर्व विधींमध्ये विश्वास आहे. सर्व विधींसह लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती. जोपर्यंत ते विधी पार पडत नाहीत, तोपर्यंत मला लग्न केल्यासारखं वाटलंच नाही”, असेही ती म्हणाली.
“सोनालीच्या लग्नाचा व्हिडीओ हा लवकरच एका मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मराठी कलाविश्वात असं कोणीच अद्याप केलं नाही. त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे”, असेही सोनालीने म्हटले आहे.
लग्नानंतर सोनाली आणि कुणाल मॅक्सिकोला हनिमूनसाठी गेले. या हनिमूनचे फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते.