सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मुलं हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला मिळतात. तर काही कलाकार मंडळी मात्र याला अपवाद ठरताना पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक आता तिचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाली आहे.
शरद पोंक्षे यांना मुलगा स्नेह आणि मुलगी सिद्धी अशी दोन मुलं आहेत. स्नेहने नुकतंच मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकत धर्मवीरच्या दिग्दर्शकांच्या टीममध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे स्नेहला नृत्याची देखील विशेष आवड आहे. त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचा आहे. तर त्यांची मुलगी सिद्धीला वैमानिक व्हायचे आहे.
शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. यात त्यांनी ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असे म्हणत शरद पोंक्षे यांनी आपल्या लाडक्या लेकीला भावनिक निरोप दिला आहे. त्यांनी त्यांच्या लेकीचा इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. यात त्यांची लेक सिद्धी दिसत आहे. त्यांचा हा फोटो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा आहे.
सिद्धी पोंक्षे ही लहानपणापासूनच शालेय शिक्षणात हुशार होती. बारावीमध्ये असताना तिने विज्ञान शाखेत ८७ टक्के गुण मिळवले होते. त्यावेळी शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर केली होती त्यावेळी लेकीच्या कौतुकात त्यांनी म्हटले होते की, ‘२०१९ साली माझे कर्करोगावरील उपचार चालू होते. रुग्णालयामध्ये येऊन कॉलेजचा अभ्यास करून एवढ्या टेंशनमध्ये असतानाही पिल्लूनं ८७ टक्के मार्क १२ विज्ञान शाखेत मिळवले. अभिमान वाटला मला आणि सतत वाईट बातम्या चहूबाजूनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
दरम्यान शरद पोंक्षे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रात त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. नाट्यसृष्टीबरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शरद पोंक्षे हे त्यांच्या विविध विधानांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी ठिपक्यांची रांगोळी, बंदिनी, दुर्वा, दामिनी, अग्निहोत्र, अग्निहोत्र २, वादळवाट, एक वाडा झपाटलेला, उंबरठा, उंच माझा झोका, अर्थ, वहिनीसाहेब, असे हे कन्यादान या सारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.