मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६४व्या वर्षी त्यांचे मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी मालिका, नाटक, सिनेमा अशा प्रत्येक माध्यमात अनेक भूमिका साकारल्या. यातील मोरूची मावशी नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. याच भूमिकेमुळे त्यांना ओळख मिळाली.
ॐ शांति प्रदीप पटवर्धन 🙏🏾🙏🏾भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏾🙏🏾
— Renuka Shahane (@renukash) August 9, 2022
मराठीतील काही मोजक्या विनोदी अभिनेत्यांपैकी प्रदीप पटवर्धन होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. यानंतर ते व्यावसायिक नाटकांकडे देखील सहभाग घेऊ लागले. १९८५ साली प्रशांत दामले यांच्यासोबत त्यांनी सुयोग निर्मित मोरूची मावशी या नाटकात भूमिका केली. या नाटकांमुळे त्यांना खूप प्रसिद्धी देखील मिळाली.
मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल होणारे नाटक ‘मोरूची मावशी’ ने तब्बल दोन हजार प्रयोग केले. या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. नाटकांसोबतच त्यांनी ‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ अशा अनेक सिनेमामध्ये काम देखील केले आहे. सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमातील त्यांचे ‘बाबू कालिया’ पात्र तर अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अभिनयासोबत त्यांनी ‘होल्डिंग बॅक’, ‘मेनका उर्वशी’, ‘थँक यू विठ्ठला, पोलीस लाईन एक पूर्ण सत्य’ या सिनेमांची निर्मिती सुद्धा केली आहे.
मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे. pic.twitter.com/CVjESFYCkf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 9, 2022
त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. सिनेसृष्टीत कार्यरत अनेक प्रसिद्ध कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सुद्धा प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले.
यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ट्विटरवर प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली देत शोक व्यक्त केला.