आज प्रत्येक सेलिब्रिटी प्रवास करतांना प्रवासामधील मजामस्ती सोशल मिडियावर शेअर करताना दिसतात. सेलिब्रिटींनी शेअर केलेल्या स्टोरीला चाहतेही उत्तम प्रतिसाद देत असतात. विमानतळावर देखील आपला आवडता सेलिब्रिटी दिसला की चाहत्यांची त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडते. मात्र यावेळी एका सेलिब्रिटीला एका महिला वैमानिकासोबत सेल्फी काढायचा मोह आवरला नाही. ती सेलिब्रिटी दुसरी तिसरी कुणी नसून श्रेया बुगडे आहे.
आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रेया बुगडेने एक सेल्फी शेअर केला आहे. आणि त्या सेल्फीमध्ये तिच्यासोबत असणारी वैमानिक एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेक आहे. या फोटोमध्ये श्रेया आणि भाऊ कदम सुद्धा दिसून येत आहेत.
ही लेडी पायलट अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांची मुलगी ईशानी आहे. आपण प्रवास करत असलेल्या विमानाची पायलट ही मराठी असल्याचा अभिमान वाटत असल्याचे श्रेया म्हणाली. “अलकाताई पाहिलं का आमच्या विमानाची पायलट कोण आहे? ईशानी तुझा खूप अभिमान वाटतोय”, असे श्रेया आपल्या पोस्टमध्ये सांगताना दिसून येते.
पायलट होणे हे ईशानीचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. त्यासाठी ईशानीने आवश्यक सर्व मेहनत आणि प्रयत्न केले. आई -वडिल दोघंही सिनेसृष्टीत कार्यरत असताना सुद्धा अलका कुबल यांच्या दोन्ही मुलींनी वेगळ्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत अधिकृत वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ ईशानीला २०१५ मध्ये मिळाले. तिने भारतात सुद्धा लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा दिल्या. काही महिन्यापूर्वीच निशांत वालियासोबत ईशानी ने लग्नगाठ बांधली.