राजा असो वा रंक… प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी संघर्ष हा येतोच. आज यशाच्या शिखरावर असलेल्या प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एकदा तरी संघर्ष आलाच असेल. दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड सिनेमे गाजवणारे अभिनेता कमल हासन यांनाही एके काळी संघर्षाचा सामना करावा लागला होता. नुकतेच इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. पण चर्चा सुरु झाली ती कमल हासनच्या एका चित्रपटाची… कारण दस्तुरखुद्द महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी या सिनेमाच्या सेटवर हजेरी लावली होती.
काही चित्रपट पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. अनेकदा चित्रपटाचं शूटिंग तर सुरु होतं पण ते पूर्ण होत नाही. असं कमल हासन यांच्या ‘मरुधानयागम’ या चित्रपटाचं झालं होतं. ‘मरुधनयागम’ या ऐतिहासिक चित्रपटाचे शूटिंग 1997 मध्ये सुरू झाले, तर या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर १९९१ मध्ये काम सुरु झालं होतं. त्याकाळात 80 कोटींचे बजेट असलेला ‘मरुधनयागम’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महाग चित्रपट असल्याचे म्हटले होते. पण, काही काळानंतर चित्रपटाच्या चर्चा बंद झाल्या. पण, स्वतः महाराणी एलिझाबेथ यांनी चित्रपटाच्या सेटवर हजेरी लावली, म्हणून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता.
१९९७ च्या वेळी या चित्रपटाचं शूटिंग चेन्नईच्या एमजीआर फिल्म सिटीमध्ये सुरु होतं. तेव्हा महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी चित्रपटाच्या सेटला भेट दिली होती. 18व्या शतकातील मोहम्मद युसूफ खान नावाच्या योद्ध्यावर आधारित चित्रपटात कमल हासन मुख्य भूमिकेत होते.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली, यावेळी एका चाहत्याने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या आठवणी शेअर केल्या. चित्रपटाच्या सेटवरील महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि कमल हासन यांचा फोटो शेअर करत चित्रपट पूर्ण करण्याची मागणी चाहत्याने केली. कमल हासन यांनीच चित्रपटात मुख्य भूमिका साकारावी अशी देखील मागणी त्याने केली.
चित्रपटाच्या मोठया बजेटमुळे चित्रपट बंद पडला होता, पण काही महिन्यांपूर्वी कमल हासन यांनी पुन्हा एकदा चित्रपट सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली.