उषा नाडकर्णी हे नाव घेतले की, समोर येतात त्यांच्या खाष्ट आणि भिडस्त स्वभावाच्या सासूच्या भूमिका… तब्बल ३ दशकांपासून अभिनय क्षेत्रात काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. अशा या उषा नाडकर्णी यांचा आज वाढदिवस.
उषा नाडकर्णी या नुकत्याच सुबोध भावे यांच्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्याला नेटकऱ्यांनीही जबरदस्त प्रतिसाद दिला. बऱ्याच दिवसांपासून हिंदी – मराठी चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींचे दिसणे आणि त्यांचा अभिनय यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर उषा नाडकर्णी यांनी बिनधास्तपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
आजकाल येणाऱ्या नव्या अभिनेत्रींना अभिनयाशी काही घेणेदेणेच नसते. आपल्या दिखाऊपणाला भाव देत लिपस्टिक, मेकअप याकडेच त्यांचे जास्त ध्यान असते. शब्दांचे फटके देत त्यांनी, या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयावर कसा फोकस करावा हे सांगितले आहे. त्यांच्या या व्हिडिओवर नेटकरी सुद्धा जोरदार प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा फारच गमतीशीर आहेत.
तीन दशके अभिनयक्षेत्रात कार्यरत असताना सुद्धा जेव्हा स्क्रिन टेस्ट किंवा लूक टेस्ट घेण्यात येते याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकदा एका मालिकेच्या ऑडिशनसाठी त्यांना बोलावण्यात आले होते तेव्हा उषाजींनी त्यांना खूप सुनावले होते. ‘बस बाई बस’ कार्यक्रमातील त्यांचे हे व्हिडीओ प्रेक्षकांचे ध्यान खेचून घेत आहेत.