बिग बॉस म्हटले की समोर येतात यात भाग घेणारे सेलिब्रेटी, त्यांच्यात होणारे राडे, त्यांना देण्यात आलेले टास्क, महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना दिलेला दम आणि प्रेक्षकांना मिळणारा मसाला… अगदी हा कार्यक्रम मराठीमध्ये सुरु झाला. तेव्हा पहिल्या पर्वापासूनच हिट झाला. अगदी आवडीने हा कार्यक्रम बहुतांश लोकांच्या घरात बघितला जातो. तीन पर्व हिट झाल्यानंतर आता २ ऑक्टोबरला या कार्यक्रमाचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. दिवस जसा जवळ यायला लागला आहे तसे या कार्यक्रमातील काही स्पर्धकांची नाव देखील बाहेर आली आहेत. किरण माने, हार्दिक जोशी या कलाकारांनंतर आणखी एका अभिनेत्याला बिग बॉससाठी विचारण्यात आले आहे.
बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. चौथ्या पर्वात कोण कोण सहभाग घेणार आहे याबद्दल अनेक अंदाज लावले जात आहेत. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्याचे नाव घेतले जात आहे. आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अनिकेत विश्वासराव आहे. पण अनिकेत या कार्यक्रमात एकटा दिसणार नसून त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री स्नेहा चव्हाण सुद्धा असण्याचे अंदाज काढले जात आहेत.
बऱ्याच दिवसांपासून ही जोडी खूप चर्चेत आहे. कारण काही महिन्यांपूर्वी अनिकेतवर पत्नी स्नेहाने घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप केला होता. अनिकेत आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध स्नेहाने घरगुती हिंसाचाराची तक्रार पोलिसात केली होती. या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया अनिकेतने दिली नव्हती.
हृदयात समथिंग समथिंग या सिनेमाच्या निमित्ताने स्नेहा आणि अनिकेतची ओळख झाली होती. अनिकेत आणि स्नेहाने डिसेंबर २०१८ ला विवाहबद्ध होत संसाराला सुरवात केली होती. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कसलाही गाजावाजा न करता लग्नगाठ बांधली होती. मात्र नोव्हेंबर २०२१ मध्ये स्नेहाने पती अनिकेत आणि सासू सासर्यांवर कौटुंबिक हिंसाचार व मारहाण केल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला.
मागील पर्वामध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला नवरा, अभिनेता अविष्कार दारव्हेकर प्रेक्षकांना दिसले होते. त्यामुळेच या पर्वात अनिकेत आणि स्नेहा सहभागी होऊ शकतात असे बोलले जात आहे.