सध्या मराठी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सरस सिनेमांची निर्मिती होत आहे आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस सुद्धा पडत आहेत. यामुळेच की काय, आता इतर भाषांतील निर्मात्यानाही मराठी सिनेमांची निर्मिती करण्याचा मोह आवरत नाही. मुंबईत संपन्न झालेल्या एका रंगारंग सोहळ्यात याची बुधवारी प्रचिती आली. बॉलिवूडमधील हिट सिनेमांची निर्मिती करणाऱ्या पारितोष पेंटर यांची निर्मिती संस्था कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांची एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन निर्मितीसंस्थांनी एकत्र येत एकाच वेळी तब्बल ७ मराठी सिनेमांची घोषणा केली आहे.
View this post on Instagram
निरवधी, सुटका, फक्त महिलांसाठी, एकदा येऊन तर बघा, ती मी नव्हेच, एप्रिल फुल आणि थ्री चिअर्स अशा ७ नव्या मराठी सिनेमांची घोषणा झाली. निरवधी हा सिनेमा महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार आहेत, तर प्रसाद ओक सुटका या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. थ्रिलर कॉमेडी स्वरुपाची फिल्म एप्रिल फुल चे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव करणार आहेत. फक्त महिलांसाठी या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी, थ्री चिअर्सचे लेखन दिग्दर्शन परितोष पेंटर, तर प्रसाद खांडेकर एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणारच नाही या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. आणि ती मी नव्हेच या चित्रपटाचे लेखन स्वतः परितोष पेंटर यांचे असणार आहे.
मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीचे कलाकार या सात चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, अंकित मोहन, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे, सई ताम्हनकर असे तगडे कलाकार या सिनेमांमध्ये झळकणार आहेत. मुंबई स्थित एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुव्रत जोशी याने केले.