मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार हे बऱ्याचदा बॉलिवूडमध्ये झळकताना दिसतात. अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या वजनदार अभिनयाने फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये सुद्धा छाप पाडली आहे.
क्रिती सॅनॉनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिमी’ सिनेमात सईने केलेल्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. तिची ही भूमिका इतकी प्रचंड गाजली की फिल्मफेअर सारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांवर सईने नाव कोरले.
सईने नुकतंच तिच्या “फक्त महिलांसाठी” या आगामी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री–दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी केले आहे.
View this post on Instagram
‘मिमी’च्या यशानंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक तेजस देवस्कर यांच्या ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात सई महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तर तिच्या सोबत लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे.तसेच अभिनेत्री झोया हुसैनदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक मिलिटरी ड्रामा असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी हा एका लष्कर अधिकारी म्हणून समोर येणार आहे. तर सई ताम्हणकर इम्रानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
सई, इम्रानसह ग्राउंड झिरो ची संपूर्ण टीम सध्या काश्मीरमध्ये सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या टीमने नुकतेच श्रीनगरमधून त्यांचे शूटींग संपवले असून आता पहलगाममध्ये शूटींगला सुरुवात झाली आहे. तर प्रेक्षकवर्ग ही नवी जोडी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे.