पुण्यात २०१२-१३ दरम्यान मानाचा मुजरा हा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात संचालकांनी ५२ लाख रुपये इतका खर्च करून या खर्चाची मान्यता मिळवली होती. त्यावेळी सभासदांनी आक्षेप घेतला आणि जो खर्च चुकीच्या पद्धतीने झाला आहे त्याची वसुली झाली पाहिजे, अशी मागणी त्यावेळी न्यायालयात करण्यात आली होती.
गेल्या १० वर्षपासून सुरु असलेल्या या खटल्याचा आज निकाल लागला आहे. पुण्यात महामंडळाच्यावतीने झालेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमात बोगस व अनावश्यक खर्च केल्यामुळे त्यांचे ११ लाख रुपये पुढील सहा आठवड्यात न्यायालयात भरावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांना, संचालकांना दिला आहे. यात माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह आणखी ११ जणांचा समावेश आहे.
संचालकांनी बोगस खर्च दाखवून पैसे उकळल्याचा आरोप सभासदांनी केला होता. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी १० लाख ७८ हजार रुपये तातडीने भरण्याचा आदेश दिला, पण याला संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण न्यायनयाने याची याचिका फेटाळून लावत हि रक्कम पुढील ६ आठवड्यात भरण्याचे आदेश दिले आहेत. हि रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अनेक संचालकांचे सभासदत्व रद्द केले आहे.
ज्यांच्याकडून ही रक्कम भरून घ्यावी असे आदेश दिलेल्या यादीत माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, सतीश बिडकर, सुभाष भुरके, अलका कुबल, अनिल निकम, मिलींद अष्टेकर, संजीव नाईक, इम्तियाज बारगीर, विजय कोंडके,सतीश रणदिवे, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती व व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांचा समावेश आहे.