झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा शो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. अल्पावधीतच या शोला प्रेक्षकांची बरीच पसंती मिळाली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हा या शोचे सूत्रसंचालन करत आहे.
बस बाई बस हा शो मुख्यतः कलाक्षेत्र आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांसाठीचा शो आहे. आतापर्यंत या शोमध्ये रिंकू राजगुरु, श्रेया बुगडे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, उषा नाडकर्णी, हृता दुर्गुळे अशा अनेक अभिनेत्रींसह राजकीय क्षेत्रातून पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, किशोरी पेडणेकर आणि अमृता फडणवीस या महिला या शोमध्ये आतापर्यंत सहभागी झाल्या आहेत.
या शोच्या आगामी भागात महाराष्ट्राची लाफ्टर-क्वीन अभिनेत्री विशाखा सुभेदार हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे अभिनेत्रींना अनेक प्रश्न विचारले जातात. विशाखाने या प्रश्नांची उत्तरे अगदीच गमतीदारपणे दिली आहेत.
यावेळी विशाखाने तिचा लोकलमधील अनुभवही सांगितला आहे. करिअरच्या सुरुवातीला प्रत्येकालाच भरपूर तडजोड करावी लागते, तशीच तिने ही केली होती. तिला सुरुवातीला रोज अंबरनाथ ते दादर असा प्रवास करावा लागायचा. त्यावेळच्या प्रवासादरम्यानच्या आठवणी तिने या कार्यक्रमात शेअर केल्या. कर्जतवरून येणाऱ्या चालत्या लोकलच्या पहिल्या महिला डब्यात अंबरनाथ स्टेशनवरून चढत असल्याचं देखील तिने सांगितलं. त्यादरम्यान लोकलच्या प्रवासात वस्तूही विकल्या असल्याचं सांगत तिने तिच्या आयुष्यातील आणि करिअरच्या सुरुवातीच्या काळातील खडतर प्रवासाच्या आठवणी सांगितल्या.
View this post on Instagram
विशाखा म्हणाली की, “मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी मी शाळेत शिक्षिका होते. तेव्हा मी आकाशवाणीलाही काम करायचे. दुपारी एक वाजता शाळा सुटली की मी लोकल पकडून विटीला जायचे. उल्हासनगरवरून मी ड्रेस मटेरिअल घ्यायचे आणि या लोकलच्या प्रवासात ते विकायचे. लिपस्टिक, नेलपेंटचा होलसेलने घेतलेला स्टॉकही मी लोकल आणि आकाशवाणीमधील महिलांना विकायचे. त्यामुळे आयुष्यातील लोकलप्रवास हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.”
तसेच ती पुढे म्हणाली की,“लोकलमध्ये वेफर्स, नेलपेंट विकणाऱ्या महिलांशीही माझी छान मैत्री होती. त्या मला नावाने ओळखत होत्या. नंतर कलाक्षेत्रात आल्यानंतर प्रयोग असल्यावर मी कायम शेवटची लोकल पकडून दोन-सव्वा दोनला घरी जायचे. लोकलमधील तृतीयपंथियांचीही मला या रात्रीच्या प्रवासात साथ मिळायची. मला कधीच त्यांची भीती वाटली नाही. त्यामुळे या लोकल प्रवासातील खूप आठवणी माझ्याजवळ आहेत”, असं म्हणत विशाखाने तिच्या आयुष्यातील लोकलमधील आठवणी शेअर केल्या.