इतकी वर्ष झाली तरी ना माधुरीच्या सौंदर्यात फरक पडला, ना तिच्या चाहत्यांमध्ये… आजही तिची ती जादू कायम आहे. तिच्या कुटुंबाची कोणतीही मनोरंजन क्षेत्राशी निगडित कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिने हे यश मिळवले हे विशेष. अगदी याच कारणांमुळे आज ती सिनेमा क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्या अनेक तरुणींची आदर्श बनून राहिली आहे. इतकेच नव्हे, आज यशाचे शिखर गाठत असलेली रश्मिका मंदाना हिच्यासाठी देखील माधुरी आदर्श असल्याचे कबूल करते. नुकताच तिने याचा खुलासा देखील केला आहे.
सध्या माधुरी कलर्स वरील ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून भूमिका बजावत आहे. दर आठवड्याला या कार्यक्रमात विविध सेलिब्रेटी येऊन जात असतात. नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना या आठवड्यात या कार्यक्रमात झळकणार आहे. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. त्यामध्ये ती दिसून आली.
View this post on Instagram
“तुमच्याच गाण्यांवर नृत्य करत आज मी अभिनेत्री झाले आणि इथवर पोहोचले. मी तुम्हाला माझी आदर्श मानते” असे रश्मिका माधुरीला सांगताना या व्हिडीओमध्ये दिसून येते. रश्मिकाच्या बोलण्यानंतर माधुरी तिला घट्ट मिठी मारते आणि तिला जवळ घेते. रश्मिकाच्या पुष्पा सिनेमातील सामी सामी गाण्यावर माधुरीने ठेका धरल्याचेही या व्हिडीओत दिसून येते.
‘झलक दिखला जा’ हा डान्स रियालिटी शो असून सध्या याचे १०वे पर्व सुरु आहे. करण जौहर, नोरा फतेही आणि माधुरी दीक्षित या कार्यक्रमात परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. रश्मिका मंदानाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग खूप खुश झाला आहे.