ख्वाडा फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ हा सिनेमा ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक आगळीवेगळी कहाणी असलेल्या या सिनेमाच्या पोस्टने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकनिर्माण झाली होती. आता नुकताच या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ख्वाडा आणि बबन असे वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांच्या यशानंतर त्यांचा हा तिसरा सिनेमा येणार आहे. विशेष म्हणजे हा विनोदी सिनेमा असून भाऊराव कऱ्हाडे हे स्वतः दिग्दर्शक आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका पार पडणार आहेत.
पिळदार शरीरयष्टी, घामेजलेले शरीर अशा अवस्थेत एक मुलगा एकटाच खाणीत काम करताना टीझरमध्ये दिसून येतो. कुणाचीही मदत न घेता तो त्याचे काम करत आहे आणि अचानक एक स्फोट होताना यात दिसून येते. वास्तविकतेचे दर्शन घडवणारा हा टिझर पाहताना यातील नायकाचा चेहरा मात्र दिसून येत नाही. त्यामुळे या सिनेमाचा नायक कोण असणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये जोरदार उत्सुकता लागून राहिलेली आहे. टिझर पाहताना कथेचा अंदाज लागत नाही मात्र हा सिनेमा गावाशी संबंध जोडणारा असेल इतकी खात्री वाटते.
View this post on Instagram
सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे म्हणतात की, “बबन सिनेमानंतर बऱ्याच दिवसानंतर मी नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. लॉकडाऊनमुळे सिनेमाक्षेत्रात बऱ्याच गोष्टी घडल्या. आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. तुमचा सिनेमा ‘टीडीएम ३ फेब्रुवारी २०२३ ला तुमच्यासाठी घेऊन येत आहे. हा टीझर मायबाप प्रेक्षकांना भावेल हीच अपेक्षा”…
‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि स्माईल स्टोन स्टुडिओ’ यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः भाऊराव कऱ्हाडे यांचेच आहे. चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्ले लेखन बी. देवकाते आणि भाऊरावांनी केले आहे. वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे.