नागराज मंजुळे हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतात ते त्यांचे सुपरहिट चित्रपट. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ हे त्यांचे चित्रपट खूप गाजले. त्याच्या सैराट, नाळ आणि फँड्री या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
नाळ हा त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळेने चैत्या, देविका दफ्तरदार यांनी त्याच्या आईची आणि नागराज मंजुळे यांनी चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा शेवट बघताना यात पुढे काय होईल असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अखेर हे गुपित आता सगळ्यांसमोर आलं आहे.
नागराज मंजुळे यांनी एक पोस्ट शेअर करत हे गुपित सांगितलं आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून ‘नाळ’ चा पुढील भाग अर्थात ‘नाळ २’ ची घोषणा केली आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये सुधाकर, नागराज, देविका आणि श्रीनिवास दिसत आहेत. हा फोटो शेअर करत नागराज म्हणाले आहेत, “मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की, नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात? नाळ सिनेमाचा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. नाळच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे! नाळ २ च्या नावानं चांगभलं!”
त्यांच्या या पोस्टमुळे प्रेक्षक खुश झाले आहेत. त्यांच्या पोस्टवर कमेंट्स करत त्यांचे चाहते आणि सिनेसृष्टीतील अनेक जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला देखील आता सुरुवात झाली आहे, हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.