कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू झाले आहे. २ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठी ४ चा ग्रँड प्रीमियर पार पडला. बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार ही उत्सुकता आता संपली. बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरच्या भव्य मंचावर इतर स्पर्धकांसोबतच या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांचीही ग्रँड एंट्री पहायला मिळाली.
हा शो वादग्रस्त म्हणून प्रसिध्द असला तरी तो तेवढाच मनोरंजक आणि कलाकारांच्या आणखी जवळ घेऊन जाणारा शो आहे. यंदाचे पर्व हे “ऑल इज वेल” या थीमवर आधारित असून या सीझनमध्ये ऑल इज वेल असणार का? आणि ते कसे? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
बिग बॉस मराठीचे चौथे पर्व १०० दिवसांच्या या प्रवासात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नेहमीप्रमाणेच यावेळी सुध्दा १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. त्यामध्ये अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, यशश्री मसुरकर, रुचिरा जाधव, अमृता देशमुख, समृद्धी जाधव, मेघा घाडगे आणि तेजस्विनी लोणारी या अभनेत्रींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, विकास सावंत, निखिल राजेशिर्के आणि त्रिशूल मराठे हे अभिनेते समाविष्ट आहेत. तसेच बॉक्सर योगेश जाधव आणि डॉ. रोहित शिंदे यांनी सुध्दा स्पर्धक म्हणून घरात प्रवेश केला आहे.
View this post on Instagram
महेश मांजरेकरांनी घरात येणाऱ्या स्पर्धकांचे वेगळ्याच पद्धतीने स्वागत केले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. स्पर्धकांना एका विशिष्ट रंगांच्या पट्टया हाताला बांधण्यासाठी दिल्या त्यानुसार त्यांच्या घरातील कामांच्या जबाबदारीचे वर्गीकरण केले आहे. यामध्ये घरातील साफसफाई, जेवण बनवणे यांसारख्या कामांचा समावेश आहे.
आतापर्यंत बिग बॉस मराठीमध्ये पहिल्या आठवड्यात यापूर्वी कधीच एलिमिनेशन झालेले नाही असे असूनही पहिल्या आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी चार स्पर्धक लगेचच बाहेर पडणार असल्याची घोषणा बिग बॉसने केली. यामुळे पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.