उदंड लोकप्रियता लाभलेले प्रेक्षकांचे लाडके अभिनेता प्रशांत दामले यांचा १२ हजार ५०० वा विक्रमी प्रयोग रविवारी श्री षण्मुखानंद सभागृहात पार पडला.
मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द १९८३ मध्ये सुरू झाली. ‘मोरूची मावशी’ या मराठी नाटकापासून प्रशांत दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. विविध सिनेमा, मालिका आणि नाटकांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत दामले यांनी चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके गाजवली. तर वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. नाटकाचे विक्रमी प्रयोग करण्यामध्ये सातत्य असणाऱ्या या कलावंताने वेगवेगळ्या १२ देशांमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग केले आहेत.
५ विश्वविक्रम नावावर असलेल्या प्रशांत दामले यांचा हा सहावा विक्रमी प्रयोग ठरला.
मागच्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे शिवधनुष्य पेलत प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेली जागा हीच त्यांच्या कामाची पावती आहे.