क्रिकेट, बॉलीवूड आणि प्रेमप्रकरण याबद्दल नेहमीच सगळ्यांना उत्सुकता असते. आपल्याकडे अनेक क्रिकेटर्स आणि बॉलीवूड अभिनेत्रींची लग्न गाठ बांधली गेली आहे.
टायगर पतोडी शर्मिला टागोर… विराट अनुष्का… चहल धनश्री…. झहीर खान आणि सागरिका घाटगे यांसारख्या अनेक जोडप्यांची उदाहरणे आपल्याला देता येतील. काही दिवसांपूर्वी शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला. ही बातमी ताजी असतानाच आणखी एका खेळाडूबद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे.
टेनिस जगतात भारताला नावलौकिक मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सानिया मिर्झाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जेव्हा सानिया मिर्झाचे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक सोबत लग्न ठरले, तेव्हा सोशल मिडियावर तिला बरेच ट्रोल करण्यात आले. पण सध्या त्या दोघांच्याच नात्यासंबंधातली एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे, त्या दोघांनी वेगळा होण्याचा घेतलेला निर्णय.
सानिया आणि शोएब पहिल्यांदा भेटले ते ऑस्ट्रेलियाच्या हॉबर्ट या शहरात. सानियाने तिच्या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितले, की जेव्हा तिच्या आयुष्यातील वाईट काळ होता, तेव्हा शोएब तिच्या आयुष्यात आला. पाच महिन्यांच्या डेटिंग नंतर त्यांनी २०१० मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. सानिया-शोएबचे अगदी थाटामाटात प्री-वेडिंग शूट्स आणि मेहंदी सोबत बाकीचे कार्यक्रम हैद्राबादमध्ये झाले. त्यांचे लग्न लाहोरमधील सिआलकोटमध्ये पार पडले. तिथून सुरु झालेल्या त्यांच्या प्रवासाबद्दल ते दोघे अनेक वेळा सोशल मिडियावर व्यक्त होताना दिसले आहेत. याला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर सानिया मिर्झा अनेक रियालिटी शोमध्ये दिसली, परिणीती चोप्रा सोबत तीने रितेश देशमुखच्या ‘यारो कि बारात’ या शो मध्ये हजेरी लावली होती, तर कपिल शर्माच्या शो मध्ये तिच्या बहिणीसोबत आली होती. ‘नच बलिये’च्या पाचव्या सिझनमध्ये सानिया आणि शोएब मलिक यांच्या जोडीने गेस्ट परफॉर्मर म्हणून परफॉर्मन्स केला होता. अशा पद्धतीने सानिया मिर्झा आणि शोएब मलिक नेहमीच चर्चेत असतात.
पण नजीकच्या काळात काही कारणास्तव ते दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चेदरम्यानच सानियाची भावूक पोस्ट समोर आली होती. ज्या मध्ये ती आणि तिचा मुलगा इजहान पोस्टमध्ये दिसत आहेत आणि कॅप्शन मध्ये ‘माझ्या आयुष्यातील कठीण काळ चालू आहे’ असे सानियाने नमूद केले आहे. त्यानंतर तिने ठेवलेली स्टोरी सुद्धा व्हायरल झाली, ज्यात तिने लिहिले होते की ‘तुटलेले हे हृदय कुठे जाईल?’
१२ वर्षे एकत्र असलेल्या या जोडीचे वेगळे होण्याचे कारण म्हणजे शोएबचे एक्स्ट्रा मॅरीएटल अफेअर असे पाकिस्तानच्या मिडियाचे म्हणणे आहे. शोएब सध्या एका मुलीला डेट करत असल्याने सानियाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रसिद्ध पाकिस्तानी मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमध्ये शोएब मलिकसोबत अभिनेत्री आयशा उमर दिसली होती. दोघांचे फोटो आणि पोज खूपच बोल्ड होते आणि त्यांची केमिस्ट्री सर्वांना दिसून येत होती. ज्या व्यक्तीमुळे सानियाचं घर तुटत आहे, ती आयशा उमर असल्याचं बोललं जात आहे. पण अजूनही याबाबतीत अधिकृत माहिती मिळालेली नाही.