‘दो दिल मिल रहे है’ हे गाणं आठवतंय?
साधारण ९० च्या दशकातलं आणि त्याची नायिका होती महिमा चौधरी, जी ‘परदेस’ या फिल्म मधून आपल्यासमोर आली होती. त्यानंतर महिमा चौधरी सिनेमांमध्ये फार दिसली नाही. तशी सोशल मीडियावर ती बरीच ऍक्टिव्ह असते. पण आता जिची सर्वत्र चर्चा चालू आहे ती महिमा चौधरीची लेक अरीयाना. ‘उंचाई’ या फिल्मच्या स्पेशल स्क्रीनिंग इव्हेंटला महिमा चौधरी आणि अरीयाना यांनी हजेरी लावली होती. त्यावेळेस तिच्या उपस्थितीची बरीच चर्चा रंगली.
याआधीही अरीयानाचे फोटोस् आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते, पण या इव्हेंट मधील अरीयानाच्या लुक्सने चाहत्यांना घायाळ केले. अरीयाना तिचा फिल्म डेब्यू कधी करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिमा चौधरीचे आयुष्य बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीने भरलेले आहे. महिमाचे २००६ साली आर्किटेक्ट बॉबी मुखर्जी सोबत लग्न झाले. २०१३ साली बॉबी मुखर्जी आणि महिमा विभक्त झाले. तिने लग्न केल्यानंतर काही महिन्यातच मुलीला जन्म दिला. घटस्फोटानंतर मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी महिमाने खूप संघर्ष केला. आता महिमा सिंगल मदर म्हणून मुलीचा सांभाळ करते.
महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे. महिमाने आपले करियर मॉडेल ऋतू चौधरी नावानेच सुरु केले होते, पण ९० च्या दशकात वेगळ्या नावासह इंडस्ट्री मध्ये येण्याची पद्धत होती. सुभाष घईंनी तिचे महिमा हे नामकरण करून तिला आपल्या परदेस या फिल्म मध्ये कास्ट केले. परदेस च्या आधी तिने एका जाहिरातीतही काम केले होते. ही जाहिरात पाहून सुभाष घई यांनी महिमाला कास्ट करण्याचा निर्णय घेतला. इंडस्ट्री सोबतच तिने पर्सनल आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत. फ्लॉप करिअर, लग्नाआधीची प्रेग्नंसी, लिएंडर पेस सोबतचे अफेअर या-ना त्या अशा अनेक गोष्टींमुळे ती चर्चेत राहिली आहे. नजीकच्या काळात ती ब्रेस्ट कॅन्सर या आजाराने त्रस्त होती, पण तिने त्यावर मात करत पुन्हा कमबॅक केले आहे आणि यासाठी तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.