मालिका क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय वाहिनी म्हणजे झी मराठी. या वाहिनीवरील मालिका कायमच चर्चेत असतात. दिवसेंदिवस मालिकांमध्ये येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांचा मालिकांना प्रचंड प्रतिसाद मिळत असतो.
आतापर्यंत झी मराठीवर वेगवेगळ्या कथांवर आधारित मालिका आलेल्या आहेत. परंतु सासू–सूनांवरील मालिकांकडे प्रेक्षकांचा बऱ्याच प्रमाणात कल असतो.
आत्तापर्यंत झी मराठी वाहिनीवर होणार सून मी या घरची, माझ्या नवऱ्याची बायको, येऊ कशी तशी मी नांदायला, अग्गबाई सासूबाई अशा अनेक मालिकांमधून सासू सूनेच्या वेगवेगळ्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. या मालिकांमध्ये सासू सुनेच्या नात्यातील गोडवा दिवसेंदिवस कसा वाढत जात आहे, तसेच सासू सूनेच्या पूर्वीच्या काळातील संकल्पना बदलवणारे घटक असल्यामुळे या मालिका प्रेक्षकांच्या मनाला भावतात. मालिका जरी काल्पनिक असल्या तरी त्यांच्यामुळे वास्तव बदलवण्याची ताकद नक्कीच असते.
झी मराठी वाहिनीवर आता एक नवी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका देखील सासू सूनेच्या आंबट-गोड नात्यावर भाष्य करणारी मालिका आहे. ही मालिका म्हणजे “अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई”. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोवरून असे समजते, की ही गोष्ट एका खोडकर सूनेच्या आणि तिच्या खोडीवर कुरघोडी करणाऱ्या खट्याळ सासूची आहे. यात ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी सासूच्या भूमिकेत दिसणार असून खोडकर सुनेची भूमिका स्वानंदी टिकेकर साकारणार आहे.
ही मालिका २१ डिसेंबर पासून बुधवार ते शनिवार रात्री १० झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. तर या मालिकेतून सासू सूनेच्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.