‘आई कुठे काय करते’ ही मालिका आजच्या घडीला मराठीतील टॉप मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अरुंधतीचं पात्र जितकं लोकप्रिय आहे, तितकं यात नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या संजनाच पात्र लोकप्रिय आहे. संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारतेय. हिंदीतील काही मालिका, बिग बॉस मराठी त्यानंतर आता ‘आई कुठे काय करते? या मालिकतून ती प्रेक्षकांच्या समोर येत आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रुपालीचा चाहता वर्ग मोठा आहे. आता मात्र रुपालीच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी एक बातमी आहे. रुपाली भोसलेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगितली आहे.
रुपाली भोसले म्हणजेच संजना काही काळ मालिकेतून गायब आहे. आता तिच्या गायब होण्याचं खरं कारण समोर आलं आहे. रुपालीची एक छोटी शस्त्रक्रिया झाली आहे. इंस्टाग्रामवर तिने तिचे उपचारादरम्यानचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली. त्यासोबतच तिने एक महत्वाचा सल्ला देखील चाहत्यांना दिला आहे.
View this post on Instagram
रुपालीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ”दुसऱ्यांची काळजी घेण्यासाठी आधी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. झाड जितके निरोगी तितके चांगले फळ देऊ शकते.”
पुढे तिने म्हटलंय की, “आयुष्यामध्ये अप्रत्यक्षरित्या काही गोष्टी घडतात. पण अशा प्रसंगांना फक्त हसत सामोरं जाणं हाच उत्तम उपाय असू शकतो. काल माझी एक छोटी सर्जरी झाली. पण आता मी ठिक आहे. मी यामधून बरी होत आहे. तुम्ही दिलेलं प्रेम व आशीर्वाद याबाबत मी आभारी आहे. बऱ्याचदा आपण आपल्या शरीरामध्ये जे बदल घडत असतात त्याकडे दुर्लक्ष करतो. जोपर्यंत शारीरिक त्रास वाढत नाही तोपर्यंत त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. शारीरिक त्रासाला आपण अधिक महत्त्व देत नाही. तुम्ही तुमच्या शरीराला आणि स्वतःला गृहीत धरू नका.”
या सोबतच तिने तिच्यावर उपचार करत असलेल्या नर्सेस आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तिच्या या पोस्ट वर तिचे चाहते भरभरून कॉमेंट करत आहेत. त्याच बरोबर तिच्या सहकलाकारांनी देखील कॉमेंट करत तिला धीर दिला आहे. आता रुपाली बरी होऊन पुन्हा संजनाच्या भूमिकेत कधी परत येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.