छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महाराजांचा मराठीजनांसमोर जो आदर्श ठेवला आहे, तो पुढे फुले-शाहू-आंबेडकर या मार्गाने भारताच्या लोकशाहीत प्रतिबिंबित झाला आहे. साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि एकूणच शिवकालीन इतिहासाबद्दल लोकांना फार उत्सुकता असते. या कालखंडाचा साहित्यावर जसा प्रभाव आहे, तसाच सिनेसृष्टीवरही आहे. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर प्रेक्षकवर्गही या शिवकालीन घटनांवर आधारित सिनेमांना आवर्जून दाद देत आहेत. अर्थात महाराजांचे कर्तुत्व एका सिनेमात अडीच तासांत सामावून घेणं कुणालाही शक्य नाही, पण त्यामुळे तुकड्या-तुकड्यांत स्वराज्याची स्थापना करणाऱ्या या महापुरुषाची गाथा लोकांसमोर येत आहे. यांपैकी बहुतेक सगळे सिनेमे OTT वर उपलब्ध आहेत. रसिकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अशाच काही चित्रपटांची यादी.
बाल शिवाजी, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, मराठा तितुका मेळवावा, छत्रपती शिवाजी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची शौर्यकथा आहे.
मागील काही वर्षांपासून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत! स्वराज्याचे मुकुटमनी, रयतेचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर, पराक्रमावर, शौर्यावर तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन त्यांना साथ देणारे त्यांचे मावळे यांच्यावर चित्रपट निर्मिती होत आहे.
तर अशाच काही चित्रपटांवर आज आपण नजर फिरवणार आहोत.
मराठी सिनेसृष्टीला भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज या सिनेमाच्या निमित्ताने ऐतिहासिक सिनेमा दिला. चंद्रकांत मांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भूमिका साकारली ती आज रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यावेळेस असलेल्या अनेक तांत्रिक अडचणी सोडवत या ऐतिहासिक चित्रपटाचे शिवधनुष्य भालजी पेंढारकर यांच्या सोबत सर्वच कलाकारांनी समर्थपणे पेलले. त्यापूर्वी मराठीत महाराजांच्या आयुष्यावर सिंहगड, कल्याणचा खजिना, नेताजी पालकर, थोरातांची कमळा, शककर्ता शिवाजी, रायगड, बहिर्जी नाईक असे सिनेमे प्रदर्शित झाले. भालजी पेंढारकर यांचे पुत्र प्रभाकर पेंढारकर यांनी १९८२ साली बाल शिवाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
अनेक वर्षापासून मराठी सिनेसृष्टीत होत असलेल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीचा ओघ मागच्या काही काळापासून वाढला आहे. आताच्या घडीला अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात
फर्जंद
फर्जंद हा चित्रपट १ जून २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, नेहा जोशी आणि समीर धर्माधिकारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सरदार कोंडाजी फर्जंद यांनी केवळ ६० मावळ्यांसह शत्रूच्या २५०० सैनिकांचा पराभव करून १६७३ मध्ये फक्त साडेतीन तासात पन्हाळा किल्ला जिंकला होता. तसेच या चित्रपटातील गाणी सुद्धा बरीच प्रसिद्ध आहेत.
हिरकणी
हिरकणी हा चित्रपट २४ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये हिरकणी म्हणून सोनाली कुलकर्णी सह मकरंद देशपांडे, अमित खेडेकर आणि प्रसाद ओक यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. हिरकणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील एक शूर स्त्री आणि एक अद्भुत आई होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या किल्ल्याची बांधणी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती. ४४०० फुट उंची असलेल्या ह्या गडावर दरवाज्यांखेरीज कोणताही येण्याजाण्याचा मार्ग नव्हता. असे म्हंटले जायचे की – ‘रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी’. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरणारी एक स्त्री म्हणजेच – ‘हिरकणी’
फत्तेशिकस्त
फत्तेशिकस्त हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, हरीश दुधाडे, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी आणि मृण्मयी देशपांडे यांनी महत्वाची भूमिका साकरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात केलेल्या पराक्रमावर तसेच सुमारे लाखभर सैनिकांच्या गराड्यात असलेल्या महालात घुसून शाहिस्तेखानावर हल्ला केलेल्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.
तान्हाजी
तानाजी – द अनसंग वॉरियर हा हिंदी चित्रपट असून १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शिवाजी महाराज यांच्या राजवाटीतला सच्चा सरदार म्हणून ओळखला जाणारा मावळा तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित ही कथा आहे. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून मिळवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि कुटुंबापेक्षा स्वराज्य मोठे आणि महत्वाचे हे पटवून दिलेली कथा या चित्रपटात आहे. तसेच या चित्रपटात तानाजी मालुसरेच्या भूमिकेत अजय देवगण असून त्यांच्यासह सैफ अली खान, काजोल आणि शरद केळकर देखील मुख्य भूमिकेत आहेत.
पावनखिंड
पावनखिंड हा चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, रुची सावर्ण, प्राजक्ता माळी, समीर धर्माधिकारी,आस्ताद काळे, वैभव मांगले यांसारखे अनेक दिग्गज कलाकार मंडळी आहेत. मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास ‘पावनखिंड’ सिनेमात दाखवला आहे.
शेर शिवराज
शेर शिवराज हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी , अजय पुरकर, मुकेश ऋषी, बिपिन सुर्वे आणि रोहन मंकणी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिवाजी महाराजांची कहाणी आहे जिथे त्यांनी अफझलखानाचा चमकदार डावपेच आणि धैर्याचा पराभव केला होता.
सरसेनापती हंबीरराव
सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट २७ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सरसेनापती हंबीरराव हे प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित मराठी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. मराठा योद्धा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनाचा पाठपुरावा करणारा हा चित्रपट आहे. तसेच या चित्रपटात प्रवीण तरडे, गश्मीर महाजनी, राकेश बापट आणि श्रुती मराठे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
तर आता छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित कोणता नवीन चित्रपट येणार याच गोष्टीची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
यांपैकी तुम्हाला कोणता चित्रपट आवडला आहे हे आम्हला कॉमेंट करून नक्की सांगा.