२०२२ हे वर्ष आता लवकरच निरोप घेणार आहे. पण त्याआधी मराठी सिनेसृष्टीमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते ती यंदाच्या काही अवॉर्ड शोजची. कलाक्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी केलेले कलाकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक यांना पुरस्कारांनी गौरविण्यात येते.
मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या अवॉर्डज् शोज् पैकी एक शो म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा पुरस्कार सोहळा येत्या ४ डिसेंबर रोजी रंगणार आहे. तर या सोहळ्याची खासियत म्हणजे यंदाचा हा सोहळा सुवर्णदशक सोहळा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये मागील दहा वर्षांच्या सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय कलाकृतींचा गौरव करण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळ्यामध्ये 12 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत यामध्ये पुढील श्रेणींचा समावेश आहे.
- फेवरेट चित्रपट
- फेवरेट दिग्दर्शक
- फेवरेट अभिनेता
- फेवरेट अभिनेत्री
- फेवरेट सहाय्यक अभिनेता
- फेवरेट सहाय्यक अभिनेत्री
- फेवरेट खलनायक
- फेवरेट गीत
- फेवरेट गायक
- फेवरेट गायिका
- फेवरेट पॉप्युलर फेस
- फेवरेट स्टाईल आयकॉन
तर पुरस्कारासंबंधित अनेक चर्चा सुरु असताना सुप्रसिद्ध लेखक, गीतकार क्षितिज पटवर्धन यांनी एक खंत व्यक्त केली आहे. पटकथाकार, नाटककार, गीतकार दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा विविध भूमिकांमधून आपला अनोखा ठसा उमटवणारे क्षितिज पटवर्धन यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टद्वारे त्यांनी लेखक आणि गीतकार यांच्या संबंधित भाष्य केले आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, “महाराष्ट्राला फेवरेट गायक आहे, गायिका आहे, संगीतकार आहे, गीतकार नाही. महाराष्ट्राला फेवरेट चित्रपट आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे, लेखक नाही. गाण्यातून शब्द काढून बघा, सिनेमातून संवाद काढून बघा, आणि सांगा ते फेवरेट होतील का? लेखक आणि गीतकार तुमचेच फेवरेट नसतील तर महाराष्ट्राचे कसे होणार?”
तसेच क्षितिज पटवर्धन यांनी कॅप्शन मध्ये एक प्रश्न विचारला की, “काय वाटतं तुम्हाला?? अजून दोन कॅटेगरी वाढवून लेखक आणि गीतकार यांनाही तितकंच मानाचं स्थान दिलं तर??”
यावर प्रेक्षकांसहित अनेक कलाकार मंडळींनी कॉमेंट करून त्यांना पाठींबा दिला आहे. यामध्ये हेमंत ढोमे, ईशा केसकर, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे.