अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, तो एका नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अजयचा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. आता या चित्रपटामधील अजयचा लूक समोर आला आहे.
View this post on Instagram
अजयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘भोला’ मधील त्याचा लूक पाहायला मिळत आहे. अजयचा हा लूक खरंच अंगावर काटा आणणारा आहे. प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेला अजयचा अवतार या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
अजयच्या कपाळी असलेले भस्म, त्याची भेदक नजर लक्ष वेधून घेणारी आहे. “एक चट्टान, सौ शैतान…” असं म्हणत अजयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपटातील त्याचा हा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये ‘भोला’बाबत उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अजयचा संपूर्ण लूक दाखवण्यात आला नव्हता.
अजय देवगणनेच ‘भोला’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अजयने याआधी तीन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आणि हा त्याचा चौथा चित्रपट आहे, ज्याचं तो दिग्दर्शन करणार आहेत. ‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. यात तब्बू सुद्धा मुख्य भूमिकेत आहे.