२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी निराशाजनक ठरलं असं म्हणायला काही हरकत नाही. जवळपास दोन वर्ष या जगाला कोरोना या महामारीच्या ग्रहणानं ग्रासलं होतं. अनेक निर्बंध आणि लॉकडाऊनच्या दोन वर्षांच्या काळानंतर २०२२ या सालामध्ये बॉलीवूडमधील अनेक बिग बजेट सिनेमे रिलीज होऊ लागले. कारण या वर्षात मोठी स्टार कास्ट आणि मोठा खर्च करून तसेच जोरदार प्रमोशन करूनही ज्या सिनेमांची हिट होण्याची अपेक्षा होती ते सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले आहेत.
बिग बजेट म्हणजेच जवळपास 100 कोटीहून अधिक खर्च करून तयार करण्यात आलेले चित्रपट. मात्र यंदा बॉक्स ऑफिसवर फेल ठरले सिनेमे खालील प्रमाणे.
शमशेरा
कधीकधी मोठा अभिनेता असो किंवा एखादं मोठं प्रोडक्शन हाऊस सिनेमा हीट ठरेलच याची शाश्वती नसते. असंच काहीसं घडलं ‘शमशेरा’ या सिनेमाच्या बाबतीत. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी या सिनेमाची जोरदार चर्चा होती मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमात फारशी कमाई करू शकलेला नाही. रणबीर कपूरची दुहेरी भूमिका असलेल्या शमशेरावर जवळपास १८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने केवळ ६५ ते ७५ कोटींचा गल्ला जमवला.
सम्राट पृथ्वीराज
जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा ऐतिहासिक सिनेमांना प्रेक्षकांनी मोठी पसंती मिळाल्याचं आजवर पाहिला मिळालंय. मात्र याला अपवाद ठरला तो म्हणजे अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट. हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात फोल ठरला. अभिनेता अक्षय कुमार आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमावर तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने फक्त ६४.६२ कोटी एवढीचं कमाई केली.
लाल सिंह चड्ढा
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सिनेमा म्हटलं तर प्रेक्षकांना त्याच्या सिनेमाकडनं भरपूर अपेक्षा असतात. आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र बहुप्रतिक्षित असा हा सिनेमा रिलीज होताच प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडली आणि हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर आपटला. या सिनेमाची निर्मिती १८० कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. परंतु आतापर्यंत केवळ ५० कोटी या सिनेमाने कमावले आहेत. सिनेमाच्या अपयशानंतरच आमिर खानने आता काही काळ बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे.
धाकड
शंभर कोटींच्या आतील धाकड हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात पुरता अपयशी ठरला. शिवाय या सिनेमाकडून कंगनाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या या सिनेमासाठी ८५ कोटी खर्च करण्यात आले होते. तर या सिनेमाने केवळ ३.७७ कोटी रुपयांची कमाई केली.
या सिनेमांसोबतच मोठी स्टार कास्ट असलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘विक्रम वेधा’. हृतिक रोशन आणि सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तसाच रणवीर सिंगचा जयेश भाई जोरदार, कटरीना कैफचा ‘फोनबूथ’, अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला रणवीर सिंगचा ‘सर्कस’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकले नाहीत.