All is Well म्हणता म्हणता बिग बॉस मराठी सिझन ४ हा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. या चौथ्या सिझनचे शेवटचे अगदी काहीच दिवस बाकी राहिले आहेत. तर लवकरच या सिझनचा विजेता घोषित होणार आहे. जसजसा सिझनचा ग्रँड फिनाले जवळ येत आहे तसतसा या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. तर दुसरीकडे स्पर्धकांमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफी साठी चढाओढ सुरु आहे.
काल झालेल्या बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी प्रत्येकाची शाळा घेतली. यावेळी इलिमिनेट झाल्यामुळे प्रसाद जवादेला घराबाहेर पडावे लागले. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.
सध्या बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, किरण माने, अक्षय केळकर आणि आरोह वेलणकर यांच्यात बिग बॉस सिझन ४ च्या ट्रॉफीसाठी चांगलीच चुरस रंगलेली पहायला मिळणार आहे.
दमदार आवाजाची स्पर्धक म्हणून ओळखली जाणारी अपूर्वा नेमळेकर हिला चौथ्या सिझनचं तिकिट टू फिनाले मिळाल्यामुळे या सिझनची पहिली फायनलिस्ट म्हणून शिक्कमोर्तब झाला आहे. तर अपूर्वा व्यतिरिक्त ईतर सदस्यांपैकी या आठवड्याच्या मध्यांतरी आणखी एक सदस्य इलिमिनेट होणार आहे.
त्यातून बिग बॉस सिझन ४ चे टॉप ५ स्पर्धक निश्चित होणार असून येत्या ८ जानेवारी रोजी बिग बॉस सिझन ४ चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.