सध्याचा सर्वाधिक गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी सिझन ४. हा सिझन ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित आणि असंख्य ट्विस्टने भरलेला होता. तर येत्या रविवारी म्हणजेच उद्या बिग बॉस सिझन ४ चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.
तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखील राजेशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपुर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशश्री मसूरकर, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे असे एकूण १६ सदस्य बिग बॉसच्या घरात गेले होते. तर शोच्या पाचव्या आठवड्यात स्नेहलता वसईकर आणि नवव्या आठवड्यात राखी सावंत व आरोह वेलणकर चॅलेंजर्स म्हणून घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेतली.
पण यांपैकी निखील, मेघा घाडगे आणी योगेश जाधव हे पहिल्याच महिन्यात घराबाहेर पडले. तर लगेचच दुसऱ्या महिन्यात त्रिशूल, रुचिरा, यशश्री आणि समृद्धी घराबाहेर पडले. परंतु त्यानंतर तेजस्विनीच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची धक्कादायक एक्झिट पाहायला मिळाली. तर तिसऱ्या महिन्यात रोहित, स्नेहलता, विकास, अमृता देशमुख आणि प्रसाद घराबाहेर पडले. अन् फिनाले विकपूर्वीच प्रसाद जवादेची एक्झिट झाली.
त्यामुळे आता घरात फक्त ६ सदस्य उरले असताना १३ व्या आठवड्यात तिकीट टू फिनाले टास्कमध्ये विजयी झाल्यामुळे अपूर्वा नेमळेकरला तिकीट टू फिनाले मिळाले अन् ती थेट टॉप ५ मध्ये पोहोचली. तर शेवटच्या आठवड्याच्या मध्यांतरी Game Of Fortune मधून आरोह वेलणकरसाठी घराबाहेर पडण्याचे दार उघडल्यामुळे तो बिग बॉस सिझन ४ च्या टॉप ५ सदस्यांच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
तर यंदाचे टॉप ५ सदस्य ठरले आहेत अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अक्षय केळकर, अमृता धोंगडे आणि राखी सावंत.
अपूर्वा नेमळेकर –
बिग बॉसच्या घरात पाऊल टाकल्यापासून ते आतापर्यंत ना तिची चर्चा कमी झाली ना तिचा आवाज… ती म्हणजे अपूर्वा नेमळेकर. तिच्यातील खेळासाठीचा उत्साह आणि खेळ जिंकण्यासाठी तिची जिद्द तिला इथपर्यंत घेऊन आली आहे हे नक्की. तर अपूर्वा कलेक्शन मधले तिचे भन्नाट टीशर्टस् देखील प्रेक्षकांच्या भारीच पसंतीस पडली आहेत.
किरण माने –
सातारचा बच्चन म्हणून घरात ओळखला गेला तो किरण माने. तो त्याच्या गावरान शैलीने प्रेक्षकांना खूपच भावला. मग त्याची विकास सोबतची मैत्री असुदेत किंवा राखी सोबतची धमाल मस्ती त्याने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकल आहे. तर दुसरीकडे त्याच रोखठोक बोलणं, त्याच्या कविता आणि इतर खूप गोष्टींमुळे टॉप ५ मध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे.
अक्षय केळकर –
या चित्रकाराने बिग बॉसच्या घरातही वेगवेगळे रंग भरले तर प्रत्येक टास्कमधेही त्याच्या खेळीने चांगलीच रंगत आली. सयंम, चलाखी आणि योग्य वेळ साधत त्याने टॉप ५ मध्ये तिसरं स्थान पटकावलं. अक्षय व अपूर्वा यांची मैत्री देखील प्रेक्षकांनाही आवडली. भांडण असो, टास्क असो वा घरातील एखाद काम… या सर्व गोष्टींना धाडसाने सामोरे जात तो बनला या घरातला ऑल राऊंडर.
अमृता धोंगडे –
बिग बॉसच्या घरात गेली अन् महाराष्ट्राची मिरची म्हणूनच ओळख निर्माण झाली ती अमृता धोंगडे. या अस्सल कोलापुरच्या मिरचीने घरात देखील तिचं मत अगदी ठामपणे मांडलं आणि तेवढ्याच जिद्दीने ती सर्वांशी भांडली. अमृता आणि तेजस्विनी यांची गोड मैत्री आणि विशाल आणि तिची जुगलबंदी फारच कमालीची होती. तिच्यातील लहान मुल जपत तिने तिच्या बळावर टॉप ५ मध्ये चौथं स्थान मिळवलं
राखी सावंत –
टॉप ५ मधील पाचवा सदस्य घरात वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतली अन् बिग बॉसच्या घरातला जणू मनोरंजनाचा पत्ताच उघडला. आणि तिच्यामुळे कळलं की कॉफी साठी पण कोणी एवढं राडे करू शकतं. ती घरात प्रत्येकाशीच नडली, प्रत्येकाची खिल्ली उडवली आणि तिने प्रत्येकाचीच मिमिक्री केली आणि प्रत्येकाशी पटो वा ना पटो पण प्रत्येकाला तिने हसवलं.
तर आता या टॉप ५ स्पर्धकांमधून कोण बिग बॉस सिझन ४ च्या विजेता पदाचा मान पटकावणार? आणि कोण यंदाच्या बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार हे समजेलच.