झी मराठीवर झालेल्या पहिल्या वहिल्या सा रे ग म लिटील चॅम्प्स स्पर्धेचं सूत्रसंचालन करत घराघरात पोहोचलेल्या पल्लवी जोशी बद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
‘द काश्मीर फाईल्स’सह अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी झाल्या आहेत. पती आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान हा अपघात झाला.
हैदराबादमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे हैदराबाद येथे चित्रिकरण सुरू आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी, नाना पाटेकर, अनुपम खेर अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एका वाहनाचे नियंत्रण सुटले आणि त्या वाहनाने सेटवर शूट करत असलेल्या पल्लवी जोशी यांना धडक दिली. यात त्यांनाधक्कादायक दुखापत झाली. पण जखमी होऊनदेखील पल्लवी जोशी यांनी आपला सीन पूर्ण केला आणि नंतरच त्या उपचारासाठी रवाना झाल्या.
सुदैवाने पल्लवी जोशी यांना झालेली दुखापत गंभीर नाही. त्यांच्यावर सध्या हैदराबादमधील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. पल्लवी जोशी यांनी 1997 मध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत.
गेल्या वर्षी 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात पल्लवी जोशी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीचीही जबाबदारी सांभाळली होती. ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटाची निर्मितीही त्या करत आहेत. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह 10 हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.