हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ऐकताच या देहामध्ये चटकन अनोख्या ऊर्जेचा संचार होतो. हीच उर्जा आणि काका-पुतण्या यांच अनोख नातं आता आपल्याला नाटकरुपात पहायला मिळणार आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुतणे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नात्यावर आधारित “बाळासाहेबांचा राज” हे नाटक लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या नात्यावर आधारित ही नाट्य कलाकृती पहिल्यांदाच समोर येत आहे.
मनसे नेत्यांच्या सहकार्याने हे नाटक बसवण्यात आले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून या नाटकाच्या प्रयोगाचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे इतर नाटकांप्रमाणे हे नाटक देखील दोन अंकी असणार आहे.
View this post on Instagram
नुकतच दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने या नाटकाच्या संहितेच अनावरण राज ठाकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती शर्मिला ठाकरे तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. महत्वाचं म्हणजे या नाटकाला सेन्सॉरचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.
बाळासाहेबांचा राज या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन अनिकेत बंदरकर यांनी केले असून गणेश कदम यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. तसेच या नाटक पूर्णत्वास नेण्यासाठी बाळा नांदगावकर, राजू पाटील, अमेय खोपकर आणि अविनाश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. ‘बाळासाहेबांचा राज’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात, दुपारी ४ वाजता सादर होणार आहे. पहिल्या प्रयोगातील दोन तासांच्या या नाटकात दोनच पात्र आहेत. एक बाळासाहेब आणि दुसरे राज ठाकरे. कलाकार सचिन नवरे हे बाळासाहेबांची आणि प्रफुल आचरेकर हे राज ठाकरें यांची भूमिका साकारणार आहेत.