झी मराठी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने गेली दीड वर्ष प्रेक्षकांना वेड लावून ठेवलं. यात प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्यांनी साकारलेल्या यश आणि नेहा या पात्रांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचप्रमाणे या मालिकेत ‘परी’ची भूमिका करणारी बालकलाकार मायरा वायकुळ ही सर्वांची चांगलीच लाडकी झाली. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यश आणि नेहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्याने त्यांचे चाहते निराश झाले आहेत. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
या आधी देखील ही मालिका बंद होणार होती, परंतु प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा सुरु करण्यात आली होती. पण आता मात्र मालिका कायमचा प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अशात श्रेयस तळपदेच्या एका पोस्टने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
होय, मालिका बंद होणार म्हणून निराश झालेल्या चाहत्यांना श्रेयसने एक गुडन्यूज दिली आहे. श्रेयसने मालिकेच्या शेवटच्या दिवसाच्या शुटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये श्रेयस सेटवर सगळ्यांची भेट घेताना दिसत आहे. व्हिडीओद्वारे त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. पण या व्हिडिओला श्रेयसने दिलेलं कॅप्शन वाचून चाहते नक्कीच सुखावणार आहेत. प्रार्थनाने सुद्धा याच सेम कॅप्शनसह एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “शो संपतोय….. आपलं नात नाही… आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे… वर्षानुवर्ष… कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ… फक्त तुमच्यासाठी… आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय… Picture अभी बाकी है मेरे दोस्त… कुछ समझे?”
श्रेयसने दिलेलं कॅप्शन काळजीपूर्वक वाचलं असेल तर एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असावी. ती म्हणजे, Picture हा शब्द. या शब्दावरून कदाचित नेहा व यशची लोकप्रिय जोडी लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळू शकते. अर्थात श्रेयसने अधिकृतपणे याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. नेमकं काय आहे, ते लवकर कळेलच.