कॅप्टन कूल म्हणून जगभरात ओळखला जाणारा क्रिकेटपटू म्हणजे महेंद्रसिंग धोनी. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून धोनीला संपूर्ण देशातून आजपर्यंत चांगलाच पाठिंबा मिळाला आहे.
क्रिकेटच्या मैदानानंतर आता सिनेसृष्टीत झळकण्यासाठी महेंद्रसिंग धोनी सज्ज झाला आहे. धोनीने २५ जानेवारी २०१९ रोजी ‘धोनी एन्टरटेन्मेंट’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या अंतर्गत आतापर्यंत तीन शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये ‘रोर ऑफ द लाॅइन’, ‘द हिडन हिंदू’ आणि ‘बिलेज टु ग्लोरी’ यांचा समावेश आहे.
तर काही काळानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये धोनी एन्टरटेन्मेंट पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीमध्ये परतण्याची घोषणा केली होती आणि अवघ्या तीन ते चार महिन्यांत नवीन सिनेमाची घोषणाही केली.
धोनी एन्टरटेन्मेंट प्रायवेट लिमिटेड या ट्विटर अकाउंटवरून धोनीच्या पहिल्या सिनेमाची घोषणा झाली असून या सिनेमाचं नाव आणि सिनेमात झळकणारे कलाकार यांचीही नावे समोर आली आहेत. धोनीच्या आगामी सिनेमाचं नाव एलजीएम : लेट्स गेट मॅरिड (LGM: Let’s Get Married) असं आहे. तसेच या सिनेमाचा मोशन पोस्टरही शेअर करण्यात आला आहे.
लव्ह टुडे या ब्लॉकबस्टर सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता म्हणजे इवाना एलजीएममध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच हरीश कल्याण, नादिया आणि योगी बाबू हे कलाकारही या सिनेमामध्ये दिसणार आहेत.
या सिनेमाच्या माध्यमातून रमेश थमिलमणी यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच या सिनेमातील गाणी देखील त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत. तर धोनीची पत्नी साक्षी धोनी या सिनेमाची निर्माती आहे. तर धोनीच्या या सिनेमासाठी त्याचे सर्वच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.