देशभरातील अनेक थिएटर्सबाहेर हाऊसफूलचे बोर्ड आज ज्या चित्रपटामुळे पाहायला मिळत आहे तो चित्रपट म्हणजे ‘पठाण‘. पठाण हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटर मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातून बादशाहाने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत दमदार एंट्री घेतली आहे. २०१८ मधील झिरो या चित्रपटानंतर शाहरुखने ४ वर्षांनी पठाण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.
तर पठाणने अवघ्या २ दिवसात केजीएफ २ आणि बाहुबली या टाॅप चित्रपटांनादेखील मागे टाकले आहे. पठाणने दोन दिवसांत तब्बल १२० कोटींची कमाई केली आहे. तर हा चित्रपटाची निर्मिती २५० कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली असून २ ते ३ दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
या चित्रपटाला देशभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत असताना काश्मीर खोऱ्यातील काही चाहत्यांनी ट्विट करत पठाणच्या आणखी एका विक्रमाची माहिती देत शाहरुखचे आभार मानताना म्हणाले की, “तब्बल ३२ वर्षांनी काश्मीर खोऱ्यात हाऊसफुलचा बोर्ड परत आणल्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत.”
पठाण हा चित्रपट वर्ल्ड वाइड ८००० स्क्रीनवर प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जवळपास ८०० स्क्रीन्स वाढवण्यात आल्या आहेत. पठाणचे भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये चित्रीकरण झाले आहे.
पठाणमध्ये शाहरुख आणि दीपिकासह जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया हे कलाकारही झळकणार आहेत. पठाण हा ब्लॉकबस्टर सिनेमा सिध्दार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला असून आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केली आहे. तर आता हा चित्रपट आणखी किती कोटींची कमाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.