दुनिया गोल आहे, जिंदगी झोल आहे, आपल्या वाटेला नाही जायचं आपला विषय खोल आहे, असं म्हणत रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारा सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. अंकुशने आतापर्यंत मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक मंचावर आपला ठसा उमटवला आहे मग सिनेमा असो, नाटक असो वा मालिका, त्याने कायमचं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
सध्या सर्वत्रच त्याचीच चर्चा सुरू आहे. त्याचे कारण म्हणजे अंकुशने सोशल मीडियावर शेअर केलेला त्याचा नव्या रूपातील फोटो. अंकुशच्या अग्निशमन अधिकाऱ्याच्या रूपातील फोटो पाहून सर्वांचंच लक्ष वेधले गेले आहे. त्या फोटोवर कमेंट करत अनेकांनी आपली मते मांडली आहेत. बहुतेक त्याचा नवीन चित्रपट येणार असून त्यातीलच हे रूप असावे, हा अंदाज सर्वजण बांधत आहेत.
परंतू अंकुशचा हा नवीन अंदाज कोणत्याही चित्रपटासाठी नसून नव्या कोऱ्या रिऍलिटी शोसाठी आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर आता डान्स रिऍलिटी शो येत आहे आणि तो शो म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार- जल्लोष ज्युनियर्सचा’. या शोमध्ये डान्सची आवड असणाऱ्या ४ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि स्वतःमधील टॅलेंटला जगासमोर आणण्याची संधी मिळणार आहे.
तर अंकुश या जबरदस्त शोचं परीक्षण करणार आहे. या शोबद्दल सांगताना अंकुश म्हणाला की, “मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा प्रोमो खूप वेगळय़ा पद्धतीने मांडण्यात आला आहे. एका वेगळय़ा अंदाजात मला प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली. प्रोमोमागचा विचार मला खूपच आवडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली बच्चेकंपनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मंचावर आग लावणार आहे. त्यामुळेच प्रोमोमध्ये मी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याच्या रूपात आहे. या पर्वाचे वेगळेपण म्हणजे स्पर्धकांसोबतच परीक्षकही सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे या चित्रीकरणाच्या निमित्ताने मी एक नवी स्टेप शिकण्याचं ठरवलं आहे. नृत्य हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी परीक्षक असलो, तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन्. मी होणार सुपरस्टार- जल्लोष ज्युनियर्सचा हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे.”
मी होणार सुपरस्टार- जल्लोष ज्युनियर्सचा या शोचं सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेत्री समृध्दी केळकर करणार असून हा शो येत्या १८ फेब्रुवारीपासून शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.