बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या कामामुळे चर्चेत असतो. तर आजही त्याचीच चर्चा आहे पण यावेळी कारण मात्र वेगळं आहे. यावेळी तो कोणत्याही प्रोफेशनल कारणामुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कौटुंबिक वादामुळे त्याच्या आयुष्यात चढ-उतार चालू आहेत. नवाजुद्दीन यांची पत्नी जैनब उर्फ आलियाच्या विरोधात नवाजुद्दीनच्या आई मेहरुन्निसा यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. तर आता आलियाच्या वकिलांनी नवाजुद्दीनवर आरोप केले आहेत.
आलियाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी तक्रारीला उत्तर देत केलेल्या आरोपांचा खुलासा केला आहे. तेव्हा ते म्हणाले की, “नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे कुटुंबीय आलियाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी त्यांनी आलिया विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिला पोलिसांच्या माध्यमातून अटक करण्याची धमकी देण्यात आली. आता ते आलियावर अत्याचार करत आहेत. गेल्या सात दिवसांपासून त्यांनी आलियाला जेवण देखील दिलेले नाही. इतकच काय तर त्यांनी तिला झोपण्यासाठी बेड आणि बाथरुम वापरण्यास मनाई केली आहे.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “आलियाच्या बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच तिच्या खोली बाहेर बॉडीगार्ड ठेवले आहेत. मलाही आलियाला भेटू देत नाहीत. तरी देखील मी आणि माझ्या टीमने आलियाची भेट घेतली. आता आम्ही नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतो.”
नवाजुद्दीन आणि आलिया यांचा विवाह २०१० साली झाला. २०११ मध्ये त्यांना मुलगी झाली. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला असूनही २०१४ मध्ये ते लिव्हिंग मध्ये राहू लागले. परंतु तेव्हाही त्यांचं नातं सावरलं नाही आणि त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला.