महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा मराठमोळा शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ यातील विनोदी कलाकार आणि त्यांच्या कामामुळे हा शो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे.
या शोमधील लाफ्टर क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आणि विनोदी कलाकार वनिता खरात नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने सुमित लोंढे सोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ यामुळे सध्या ती खूपच चर्चेत होती.
वनिताच्या लग्नात हास्य जत्रेचे अनेक कलाकार उपस्थित होते. लग्नासाठीच नाही तर मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी आणि गृहप्रवेश अशा सर्वच कार्यक्रमांमध्ये ही कलाकार मंडळीनी हजेरी लावली. त्यांच्यामुळे या आनंदात आणखीनच भर पडली हे नक्की.
वनिताने फार कमी लोकांच्या उपस्थितीत हे लग्न केले असले तरी, या लग्नासाठी हास्य जत्रेचे परीक्षक म्हणजेच प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर मात्र उपस्थित नव्हते. ते कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या अनुपस्थितीबद्दल चर्चा रंगल्या होत्या.
पण वनिताच्या लग्नानंतर अवघ्या काहीच दिवसांत प्रसाद आणि सईकडून या बद्दलची वाच्यता झाली आहे. प्रसादने नुकतच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यामधे प्रसाद सोबत सई आणि सोनी मराठीचे कंटेंट हेड अमित फाळकेही दिसून येत आहेत.
या व्हिडिओमध्ये ते तिघेही हात जोडून माफी मागताना दिसत आहेत. तसेच या व्हिडिओला कॅप्शन देत प्रसादने लिहिले की, “वनिताच्या लग्नाला उपस्थित राहता न आल्यामुळे मी, सई ताम्हणकर आणि अमित फाळके जाहीर माफी मागत आहोत.” तर प्रसादची ही स्टोरी रिपोस्ट करत वनिताने फारच गमतीदार उत्तर देत तिने लिहिले की, गिफ्ट दिल्याशिवाय माफी मिळणार नाही.”
तर प्रसाद आणि वनिता या दोघांची स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे.