महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरातील मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या शो मधून अनेक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. तसेच वेगवगळ्या कला अवगत असलेले कलाकारही या कार्यक्रमात येत असतात.
आताच पार पडलेल्या या भागात महाराष्ट्राच्या काही अन्नपुर्णा ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आपली पाककला शिकवण्याचा प्रयत्न करतात. तर या सुगरणींमधील एक अन्नपुर्णा होती ही अभिनय देव यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची सून ‘स्मिता देव’.
तर यावेळी स्मिता देव यांनी त्यांच्या सासऱ्यांबद्दल म्हणजेच रमेश देव यांच्या अनेक आठवणींना या कार्यक्रमात उजाळा दिला आहे. अष्टपैलू अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९६व्या वर्षी २ फेब्रुवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात स्मिता देव या प्रसिध्द शेफ म्हणून आल्या होत्या. यावेळी त्यांनी अनेक खाद्यपदार्थांबद्दल चर्चा केली. तसेच त्यांनी त्यांच्या काही गोड कौटुंबिक आठवणीही सांगितल्या. यात रमेश देव यांची जेवणाची आवड आणि सवयींबद्दल सांगितले.
तेव्हा स्मिता देव म्हणाल्या की, “रमेश देव कोणत्याही प्रकारचं डाएट करत नव्हते. त्यांना जे आवडायचं ते पदार्थ ते मनसोक्त खायचे. त्यांना गोड पदार्थ आणि विशेष म्हणजे घरी केलेले पदार्थ प्रचंड आवडायचे. त्यांचं खाण्यावर मनापासून प्रेम होतं त्यामुळे त्यांना हवे ते पदार्थ ते आवर्जून खायचे.”
तसेच त्यांनी आणखी एक प्रसंग सांगितला की, एके दिवशी घरी पाहुणे येणार होते. त्यांच्यासाठी मी घरी पारंपरिक असा तांबडा पांढरा रस्सा करत होते. त्यावेळी बाबा किचनमध्ये आले आणि त्यांनी मला विचारलं ‘छोटी तू काय करत आहेस. त्याची चव मला चाखायला दे.’ मी त्यांना तांबडा पांढरा रस्सा चव घेण्यासाठी दिला. तो चाखल्यानंतर ते रडू लागले. नंतर त्यांनी मला सांगितलं की, ही चव घेतल्यावर त्यांना त्यांच्या आईनं केलेल्या रस्सा आठवला.” आणि हा गोड प्रसंग सांगताना स्मिता देव खूपच भाऊक झाल्या होत्या.