सिनेमा कोणत्याही भाषेतील असो प्रत्येक सिनेमाची पडताळणी होतेच. मुख्यतः एखादा सिनेमा जर ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असेल तर आणखीनच. आतापर्यंत अनेकदा ऐतिहासिक सिनेमे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘द केरळ स्टोरी’ (the kerala story) या आगामी सिनेमाचा वाद सुरू असतानाच दुसरीकडे ‘टिपू’ (tipu 2023) या सिनेमावरुन वाद पेटला आहे.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story)
टिपू (tipu 2023) या आगामी सिनेमाची घोषणा झाली अन् त्यानंतर नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून अवघ्या काही क्षणातच चर्चांना उधाण आले आहे. या पोस्टरमधून आजवर आपण सर्वांनी वाचलेल्या आणि पाहिलेल्या इतिहासाच्या अगदी उलट इतिहास या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. तर या पोस्टरमध्ये दाखवल्याप्रमाणे टिपू सुलतानने आजवर किती मंदिरे उद्ध्वस्त केली, किती लोकांचे धर्मांतरण केले, किती लोकांवर अन्याय केला, ह्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
शेवटी टिपू सुलतानच्या चेहऱ्यावर काळे फासल्याचे देखील बघायला मिळत आहे. त्यामुळे आत्तापर्यंतचा इतिहास चुकीचा की हा असा संभ्रम निर्माण झाला आहे. टिपू (tipu 2023) या सिनेमाची घोषणा निर्माता संदीप सिंह (Sandeep Singh) यांनी केली. म्हैसूर साम्राज्याचा राजा टिपू सुलतान यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. रश्मि शर्मा आणि संदीप सिंह (Sandeep Singh) यांनी ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन पवन शर्मा (Pawan Sharma) यांनी केले आहे.
दिग्दर्शक पवन शर्मा (Pawan Sharma) यांनी या सिनेमाबद्दल सांगताना म्हणाले की, “आपल्याला आजवर पाठ्यपुस्तकातून टिपू सुलतानबद्दल सगळी चुकीची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा टिपूबद्दल काही भयानक गोष्टी माझ्यासमोर आल्या तेव्हा मला खूप मोठा धक्काच बसला. या चित्रपटाच्या माध्यमातून ते भयावह सत्य उघडकीस आणणार आहे, जे इतक्या दिवसांपासून आपल्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. टिपू हा त्याच्या वडिलांपेक्षा क्रूर होता. तो त्या काळातील हिटलरच होता.”
View this post on Instagram
तसेच निर्माते संदीप सिंह (Sandeep Singh) यांनी स्वत:च्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्टर शेअर करत लिहिले की, “टिपू सुलतानबद्दल जेव्हा वाचलं, ऐकलं तेव्हा तेव्हा धक्काच बसला. माझ्या अंगावर काटाच आला. माझा माझ्या सिनेमांवर विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असो, मैं अटल हूं किंवा बाल शिवाजी असो माझे चित्रपट सत्याच्या बाजूनं उभे असतात. मला वाटतं की लोकांना टिपू सुलतान कोण आणि कसा होता? हे माहीत होतं पण त्यांनी त्याकडं दुर्लक्ष करणं पसंत केलं. आणि हेच मला 70mm वर दाखवायचं आहे. आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये दाखवल्याप्रमाणं तो एक धाडसी होता असं सांगून माझं ब्रेनवॉश झालं होतं. पण त्याची दुष्ट बाजू कोणालाच माहीत नाही. त्याची काळी बाजू मला भावी पिढीसमोर उलगडून दाखवायची आहे.”
त्यामुळे हा वाद संपून सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची वाट सर्वचजण पाहत आहेत. टिपू (tipu 2023) हा सिनेमा हिंदीसह कन्नड, तमिळ, तेलुगू अन् मल्याळम् भाषेत प्रदर्शित होणार आहे.