सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणारा सिनेमा म्हणजे ‘महाराष्ट्र शाहीर’. केदार शिंदे दिग्दर्शित हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आणि पाहता पाहता या सिनेमाने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकून घेतले. महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर व लोकनाट्यकार स्वर्गीय ‘कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे’ यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा.
हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्याचे कारण म्हणजे टप्याटप्याने प्रदर्शित झालेले सिनेमाचे पोस्टर, टिझर, ट्रेलर आणि विशेषतः यातील गाणी या सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होत्या.
मराठी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या प्रमुख भूमिकेत दिसला असून शाहिरांच्या पत्नीची भूमिका सना शिंदे हिने साकारली आहे. तसेच या सिनेमात आणखी लोकप्रिय कलाकार देखील झळकले आहेत. या सर्वांनाच या सिनेमातून नवी ओळख मिळाली हे नक्की. पण त्यांची ही कामगिरी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती आता साता समुद्रापार देखील पोहोचली आहे.
View this post on Instagram
शाहीर या सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. तर या सिनेमाच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. येत्या ५ मे ते १४ मे दरम्यान हा सिनेमा थेट अमेरिकेतील रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अमेरिकेतील डल्लास, शिकागो, सॅन दिएगो, न्यू जर्सी, रीचमंड हील यांसारख्या अनेक ठिकाणी महाराष्ट्र शाहीर पाहायला मिळणार आहे.
साता समुद्रापार असेलल्या मराठी मातीतील मराठी रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्र शाहीर पाहण्याची संधी मिळावी यासाठी ही खास उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीसाठी आणि मराठी रसिक प्रेक्षकांसाठी ही खूपच अभिमानाची बाब आहे.