‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी अनोखी ओळख निर्माण करत प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे ‘गौरव मोरे’. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमातून गौरव घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाने संपूर्ण जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे.
एकास एक वरचढ कथा आणि त्या कथेचे उत्तम सादरीकरण करणाऱ्या हास्यरथींपैकी एक गौरव मोरे. या कार्यक्रमाचा विचार गौरव शिवाय होऊच शकत नाही. आजवरच्या एकाही भागात किंवा स्किटमध्ये त्याचा अपमान झाला नसेल असा एकही भाग नाही. असे असूनही त्याने प्रेक्षकांच्या मनात मात्र एक सर्वोत्तम हास्यवीर म्हणून आदराचे स्थान मिळवले आहे.
गौरवने आज शून्यातून नावलौकिक मिळविले. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या कारकीर्दीत आणखीनच भर पडत आहे. नुकतीच गौरवने एक खास पोस्ट त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केली आणि या पोस्टद्वारे त्याने त्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. नावाप्रमाणेच आज त्याचाही ‘गौरव’ झाला आहे तेही एका बहुमानाच्या पुरस्काराने. गौरवला संभाजी ब्रिगेडचा यंदाचा ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२३’ हा पुरस्कार घोषित झाला आहे.
View this post on Instagram
ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत गौरवने लिहिले की, “संभाजी ब्रिगेडचा ह्यावर्षीचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२३, हा पुरस्कार मला दिल्याबदल सगळयांचे मनापासुन आभार मानतो. जय शिवराय जय शंभुराजे.” हा पुरस्कार सोहळा पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे, येत्या रविवारी १४ मे रोजी पार पडणार आहे.
गौरवच्या या पोस्टवर संपूर्ण कलाविश्वातून आणि त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.