बॉलिवूड प्रमाणेच सध्या मराठी सिनेमे देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. काही सिनेमे वादामुळे तर इतर रंगणाऱ्या चर्चामुळेच जास्त प्रसिद्ध होतात. मराठी सिनेमांना डावललं जातंय असे म्हणणारा सिनेमा म्हणजे ‘टीडीएम’. यामुळेच हा सिनेमा मागील काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत राहिला.
भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित टीडीएम हा सिनेमा २८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतू त्याच दिवशी केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर‘ हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार असल्यामुळे टीडीएमचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. सिनेमावर झालेल्या अन्यायामुळे आता थेट प्रेक्षकांनीच सिनेमाला पाठिंबा दिला आहे. पण टीडीएमच्या चाहत्यांसाठी आता खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
‘टीडीएम’ हा सिनेमा आता थिएटरमध्ये पुर्नप्रदर्शित होणार असून येत्या ९ जून २०२३ रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्राच्या रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा सिनेमा एका वेगळ्याच विषयावर आधारित असल्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
टीडीएमबद्दल दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगितले की, “मी सर्वप्रथम जनतेचे, प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे आभार मानतो. खूप मोठी घटना होती ही, यामध्ये सर्व जनता, प्रेक्षक आणि मित्रपरिवार पाठीशी उभे राहिले त्यामुळे नवी उमेद मिळाली, आणि म्हणून ‘टीडीएम’ येत्या ९ जूनला प्रदर्शित होतोय. एक कलाकार म्हणून जेव्हा एवढा सपोर्ट मिळतो त्यामुळे बळ वाढलंय. बऱ्याच दिग्गज मंडळींनी ही फोन करून खंबीर साथ दिली, बळ दिल. तसेच सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांनी ही स्वतः फोन करून खंबीर साथ दिली, पाठिंबा दर्शविला, खचून न जाता उभं राहण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या या प्रेमाच्या शब्दापोटी मी आज उभा आहे. मी मायबाप प्रेक्षक आणि सर्वांचाच आभारी आहे.”
View this post on Instagram
आता या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या सिनेमाबद्दल नवनवीन पोस्ट देखील सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. त्यावर चाहते देखील सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांना शुभेच्छा देत आहेत.
हे देखील वाचा : कोण होता ‘सायनाईड मोहन’ ?