अशोक सराफ मामा: छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या रिअॅलिटी शोपैकी एक म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’ हा शो. यापूर्वी या कार्यक्रमाचे २ पर्व पूर्ण झाले आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवरून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात पुढील महिन्यात ४ जूनपासून होणार आहे.
अवघ्या १० वर्षांनंतर प्रदर्शित होणाऱ्या या कार्यक्रमाचा प्रोमो देखील चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा पाहायला मिळत आहे. यानिमित्त मागील पर्वातील अशोक सराफ यांचा एक सुंदर व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर वर्चस्व गाजविणारे मराठी अभिनेते म्हणजे अशोक सराफ. वयाच्या ७५व्या वर्षी देखील त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. ते त्यांच्या चाहत्यांचे आणि संपूर्ण सिनेसृष्टीचे मामा आहेत आणि कायम राहणार.
परंतू अशोक सराफ यांना ‘मामा’ हे नाव कसे मिळाले याचा खुलासा त्यांनी स्वतः खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात केला. यावेळी त्यांनी सांगितले की, “कोल्हापूरकडे ‘मामा’ म्हणणं हे लोक खूप मानाचं समजतात. एका चित्रपटाचं तिथे शूटिंग करत असताना आमचा कॅमेरामॅन त्यांच्या छोट्या मुलीला एकदा सेटवर घेऊन आला आणि तिला म्हणाला, हे बघ…हे कोण? हे अशोक मामा. त्या लहान मुलीला मला मामा म्हणायला सांगताना तोच मला मामा म्हणू लागला.”
View this post on Instagram
तसेच ते पुढे म्हणाले की, “तिथे बाकी सगळे स्पॉट बॉईज आणि काम करणारी मंडळी होती त्यांना मला काय म्हणायचं हा प्रश्नच होता. साहेब म्हणणं त्यांना लांबच वाटत होतं आणि अशोक तर ते म्हणू शकत नव्हते. म्हणून मग त्यांनीही मला मामा म्हणायला सुरुवात केली. यानंतर मला इतके लोक मामा म्हणून लागले की आता शूटिंग पाहायला आलेली लोकही मला मामा म्हणतात. लोक मला मामा म्हणतात याचं मला सुख जास्त वाटतं.”
अशोक मामांची कारकीर्द आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असावा असे प्रत्येक नवोदित कलाकारांना वाटते.