मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे (Kedar Shinde). अनेक मराठी सिनेमांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. अभिनयानंतर ते लेखनाकडे देखील वळले अन् त्यानंतर जन्म झाला एक नवा दृष्टीकोन प्रेक्षकांसमोर ठेवणाऱ्या दिग्दर्शकाचा.
‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘गलगले निघाले’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनातून सिनेसृष्टीला मिळाले. या सिनेमातूनच आणखी एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे बायकांच्या मनातील कोणालाच समजू शकत नाही हा समज आता पुसला गेला. कारण, या गोष्टीला अपवाद ठरले ते केदार शिंदे. यांनी महिलांच्या मनातील निरनिराळ्या अन् बारीकसारीक गोष्टींचा ठाव घेऊन सुंदररित्या सिनेमात उतरवणे आणि केवळ महिलांनाच नाही तर तमाम रसिक प्रेक्षकांना आपल्या कलेची भुरळ घातली.
२००४ सालच्या ‘अगं बाई अरेच्चा’नंतर नुकताच लोकप्रियतेचा शिखर गाठलेला ‘बाईपण भारी देवा’ यांतून केदार यांनी बायकांचं मन अचूक टिपलं आहे. बाईपण भारी देवा हा सिनेमा तर इतका गाजला की, हा सिनेमा गेल्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आणि मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला. तर आता महिलानंतर केदार यांनी खूपच नाजूक विषयाला हात लावला आहे. तो विषय म्हणजे आई. आई आणि प्रत्येक मुलाचं नातं काही औरच असतं. त्यामुळे हे नातं आता नव्या रुपात रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी केदार यांनी नुकतीच त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली.
केदार यांचा बाईपण भारी देवानंतर आता ‘आईपण भारी देवा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्थात या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे करणार आहेत. तर ज्योती देशपांडे आणि सौ. बेला शिंदे या निर्मितीची आणि अजित भुरे हे सहनिर्मात्याची धुरा सांभाळणार आहेत. तसेच वैशाली नाईक आणि ओंकार मंगेश दत्त यांचे या सिनेमाला लेखन लाभणार आहे. आईपण भारी देवा या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करत केदार शिंदे यांनी या सिनेमाची घोषणा केली. तसेच हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, “प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा.’”
View this post on Instagram
आईपण भारी देवा या सिनेमाचे पोस्टर समोर आल्यापासून या सिनेमात कोणकोणते कलाकार झळकणार तसेच या सिनेमाचे शूटिंग कधी सुरु होणार, कधी संपणार आणि सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडेच साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.