सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे ‘स्वातंत्रवीर सावरकर’ या सिनेमाची. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. मागील आठवड्यात म्हणजेच २२ मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षक या सिनेमाला भरभरून प्रतिसाद देत आहेत, तसेच प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील मंडळींकडून देखील सिनेमाला प्रचंड प्रेम मिळत आहे. ‘स्वातंत्रवीर सावरकर’ हा सिनेमा विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान देशासाठी घेतलेले कष्ट सर्वकाही या सिनेमात अगदी स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा एकाच दिवशी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. सिनेमाचं आणि सिनेमातील कलाकारांच सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे. एका आठवड्यात तब्बल ११ कोटींच्या वर सिनेमाने कमाई केली आहे.
या सिनेमात रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत. तसेच या सिनेमासाठी रणदीप हुड्डा याने प्रचंड मेहनत घेतली आहे. रणदीपने अभिनयासोबतच स्वतः या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकताच एका पोडकास्ट दरम्यान रणदीपने या सिनेमाच्या दरम्यान घेतलेली मेहनत आणि कोण कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले याचा उलगडा केला. २०२४ हे निवडणूकीचं वर्ष आहे, या दरम्यान सिनेमाकडे दुर्लक्ष होऊ नये आणि हा सिनेमा जगभरात पहिला जावा अशी रणदीपची इच्छा होती. तसेच सिनेमाच्या निर्मितीसाठी रणदीपने त्याच्या वडिलांची संपत्ती विकून या सिनेमावर पैसा लावला आहे.
याचा खुलासा स्वतः रणदीपने केला, यावेळी बोलताना तो म्हणाला, “मला हा सिनेमा गेल्या वर्षी १५ ऑगस्टला किंवा त्यानंतर २६ जानेवारीला प्रदर्शित करायचा होता. मी खूप मेहनत घेतली, पण तरीही तो पूर्ण होऊ शकला नाही. आम्हाला खूप अडचणी आल्या, कारण सुरुवातीला या सिनेमाशी जोडलेल्या टीममधील लोकांचा दर्जेदार सिनेमा बनवण्याचा हेतू नव्हता. त्यांना फक्त सिनेमाची निर्मिती करायची होती. आम्हाला आर्थिक अडचणी आल्या. माझ्या वडिलांनी बचत करून माझ्यासाठी मुंबईत दोन-तीन प्रॉपर्टी विकत घेतल्या होत्या, मी त्या विकून आलेले पैसे सिनेमा निर्मितीसाठी वापरले. माझ्या या सिनेमाला कोणाचाही पाठिंबा नव्हता.”
तसेच या सिनेमासाठी रणदीपने स्वतःच्या शरीरावर देखील खास मेहनत घेतली होती. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी फक्त पाणी, ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी पीत होतो. नंतर मी माझ्या आहारात डार्क चॉकलेट आणि नट्स आणि इतर पदार्थ समाविष्ट केले. माझ्या आहारामुळे माझी झोप कमी होऊ लागली होती. त्यामुळे कित्येकदा मी सेटवर पडलो होतो.”