मुंबई हे प्रत्येकासाठी स्वप्नांचं शहर आहे. इतकच नाही, तर अनेक प्रेक्षणीय स्थळे मुंबईमध्ये स्थित आहेत. समुद्राने वेढलेल्या या शहराच त्याच असं एक वेगळ सौंदर्य आहे. मुंबई ही सगळ्यात जास्त ओळखली जाते ती म्हणजे ‘बॉलिवूडसाठी’(Bollywood). मायानगरी मुंबईची कोणतीही ट्रीप बॉलिवूडशिवाय पूर्ण होत नाही. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी अमिताभ बच्चनचा बंगला किंवा शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला हा पर्यटनस्थळापेक्षा कमी नाही.
बॉलिवूड ही जगातील सगळ्यात मोठी आणि सुप्रसिद्ध अशी चित्रपटसृष्टी आहे. इथलं वैभव, तसेच बॉलिवूडमधील कलाकारांना पाहण्यासाठी अगदी दूरदूरहून लोकं येत असतात. बॉलिवूडमध्ये काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. संपूर्ण बॉलिवूड एकत्र पाहण्यासाठी मिळण हे म्हणजे एक प्रकारचं जणू सुखचं आहे. मुंबईत अशी अनेक ठिकाण आहेत जिथे आपण हे सगळ पाहू शकतो. तर आता यात आणखी एका जागेची भर पडणार आहे.
मुंबईतील एका मेट्रो स्थानकाखाली बॉलिवूडचा १०० वर्षाचा इतिहास उलगडणार आहे. ‘मेट्रो लाईन २बी’च्या खाली शिल्प, एलईडी दिवे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ‘बॉलिवूड थीम पार्क’ उभारण्यात येणार आहे. ईएसआयसी नगर ते वांद्रे यामध्ये ७ स्टेशन येतात व त्यामधील जवळपास ३०० खांबावर हे सगळ दाखवण्यात येणार आहे. याची माहिती आशिष शेलार यांनी नुकतीच एका मुलाखतीदरम्यान दिली. त्यांच्या संकल्पनेतून बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट आणि कायमच लक्षात राहतील असे सिनेमे, कलाकार, गायक आणि तसेच सिनेमाच्या संबंधित अनेक कलाकृती इथे पाहायला मिळणार आहे.
याबद्दल बोलताना आशिष शेलार म्हणाले, “एमएमआरडीएकडे ‘बॉलिवूड थीम पार्क’ संदर्भात मी प्रस्ताव मांडला. त्यांच्याकडून तो मान्य केला गेला. साधारण ३५५ खांसांमध्ये हा पार्क उभा राहिल. ज्यात ६ किलोमीटरपर्यंत हे काम होणार आहे. बॉलिवूडमधील १९१३ ते २०२३ या मोठ्या कालखंडाचा विचार करुन त्या कालखंडातील महत्वाच्या घटना, सिनेमा, त्यातील स्टार आणि प्रसंगावर या थीमची रचना करण्यात येणार आहे.”
हे देखील वाचा: तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांचा साखरपुडा संपन्न, लग्नाची तारीख आली समोर…
पुढे ते म्हणाले, “दादासाहेब फाळकेंनी ज्या काळात अधिराज्य गाजवलं तो काळ, त्यानंतर १९१३ ते १९३९ पर्यंत, त्यानंतर १९७० पर्यंत आणि नंतर २०२४ पर्यंत फिल्म इंडस्ट्रीत असलेले स्टुडिओ, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते या सगळ्यांचा यामध्ये समावेश असेल. सोबतच ४ प्रमोशनल बेज्ज ठेवण्यात आले आहेत. खर्च मोठा होणार आहे. त्यात एमएमआरडीएकडून उत्पन्नाचे साधन देखील निर्माण केले जातील. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. प्रोडक्शन हाऊसेस, कॅफे, प्रमोशनल सेंटरचीदेखील उभारणी होताना दिसेल.”
आता त्यांच्या या संकल्पनेला किती प्रतिसाद मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.