सध्याची लहान मुलं मोठ्यांनाही लाजवतील अशी सुरेल आवाजात गाणी गातात. टीव्हीवर अनेक रिॲलिटी शोमध्ये लहान मुलांच्या गाण्याच्या स्पर्धा दाखवल्या जातात. ही मुलं आपल्या आवाजाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करतात. काही महिन्यांपुर्वीच झी मराठी वाहिनीवर सुरु झालेला सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम सुरु झाला होता. या शोमधील बच्चे कंपनीने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या महाअंतिम सोहळ्याला आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या या पर्वात श्रावणी वागळे, जयेश खरे, हृषिकेश ढवळीकर, देवांश भाटे, आणि गौरी पगारे यांनी महाअंतिम फेरीत स्थान मिळवले. यांच्यातील स्पर्धा सुरुवातीपासूनच फार स्फूर्तीदायक होती. त्यामुळे महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा स्पर्धकांपैकी नेमकी बाजी कोण मारणार आणि यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे सगळ्याचेच लक्ष वेधले होते. या अटीतटीच्या सामन्यात कोपरगावच्या ‘गौरी पगारे’ हिने महाअंतिम फेरीत पहिला क्रमांक पटकावला.
गौरी ही एका छोट्याश्या खेडेगावात राहणारी मुलगी आहे. घरची हलाखीची परिस्थिती असतानाही गौरीने त्यावर मात करत विजेते पद पटकावले. तिने लहान वयातच गायिका व्हायचं स्वप्न पाहिलं होते. तिचं हे स्वप्न सारेगमप लिटिल चॅम्प्स मंचावर पूर्ण देखील झाले. विशेष म्हणजे गौरीने गायनाचा कोर्स न करता हे यशाचे शिखर गाठले. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचाने तिला खरी ओळख मिळवून दिली. त्यामुळे सर्वत्र तिच्याच नावाचा गाजावाजा झाला.
विजेते पद पटकावल्यामुळे गौरीला पारितोषिक म्हणून १,५०,००० चा धनादेश आणि चांदीची वीणा देण्यात आली आहे. महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या सगळ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती गौरी तसेच या शोमध्ये प्रथम उपविजेती ठरली मुंबईची श्रावणी वागळे व द्वितीय उपविजेते पद जयेश खरेला मिळाले. त्यांना देखील प्रत्येकी एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात आले. तर इतर स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मृण्मयी देशपांडे हिच्या सूत्रसंचालनाने या पर्वाला अजूनच बहर आली. सारेगमप लिटिल चॅम्प्सचा हा महाअंतिम सोहळा देखील अगदी दिमाखात पार पडला. एकूण काय तर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चे हे पर्व स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरले.
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या महाअंतिम सोहळ्यात विजेती झाल्याने गौरी पगारेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सर्व स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.