मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम नट आणि विनोदी अभिनेता म्हणजे अरुण कदम. त्यांच्या दमदार विनोदाचा संपूर्ण महाराष्ट्र चाहता आहे. मागील बरीच वर्षे ते महाराष्ट्राला खळखळून हसवण्याचं काम करत आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे लोकप्रिय अभिनेते अरुण कदम हे संपूर्ण महाराष्ट्रात दादूस म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या भाषेतील खास मालवणी तडक्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांची विनोदाची स्टाइल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ते आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. त्यांनी मराठी चित्रपटात अनेक प्रेक्षणीय विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी शिन्मा, इश्क प्रेम लव्ह, १२३४, सासूबाई गेल्या चोरीला, जस्ट गंमत, येरे येरे पैसा, टाटा बिर्ला आणि लैला, अनुमती तसेच कोण आहे रे तिकडे असे अनेक मराठी चित्रपट त्यांच्या विनोदाने आणि उत्कृष्ट अभिनयाने गाजले आहेत.
अरुण कदम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी सुरुवातीला रंगभूमीवर अनेक नाटक आणि एकांकिका केल्या आहेत. आपल्या आगरी शैलीत ते कित्तेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच अरुण कदम यांच्या लेकीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे दादुसचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेव्हा देखील अरुण कदम प्रचंड चर्चेत आले. तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांनी जावयाचा अधिकमास सण सुद्धा धुमधडाक्यात साजरा केला होता.
अरुण कदम हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. ते त्यांच्या फॅमिली सोबतचे खास फोटोज् आणि व्हिडिओज् सोशल मीडियावर शेअर करत असतात. अरुण कदम यांच्या घरी चिमुकल्याच आगमन झाल्याने त्यांनी इंस्टाग्राम माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली होती. त्यामुळे दिवसेंदिवस ते आपल्यासोबत काय शेअर करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधलेले असते. परंतू आता मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी या खास दुवा असणारं हे इंस्टाग्राम अकाऊंट आता हॅक झाले आहे. त्यामुळे सध्या ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले असून, ब्लू टिक असलेल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॅकरने त्यांचे सर्व फोटो डिलीट करून स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. आणि आता हॅकरने त्यांच्या अकाऊंटचा संपूर्णपणे ताबा मिळवला आहे.
अलीकडच्या काळात जवळपास सर्वच कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर संपर्कात असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव ते फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. परंतू, बऱ्याचदा कलाकारांना अकाऊंट हॅकिंगचा सामना करावा लागतो. या आधीसुद्धा बऱ्याच कलाकारांना हॅकर्सचा सामना करावा लागला होता. ज्यात अमृता धोंगडे, केदार शिंदे, अभिनेत्री क्षिती जोग यांचं फेसबुक-इन्स्टाग्राम अकाऊंट देखील अशाचप्रकारे हॅक करण्यात आले आहे. तसेच अरुण कदम यांचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.