मराठी मालिकाविश्वात सध्या नवनवीन मालिकांची सरबत्तीच सुरु आहे. नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच टीआरपीच्या यादीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी या मालिका तारेवरची चांगलीच कसरत करत आहेत. परंतू गेल्या वर्षापासून स्टार प्रवाहवरील जुई गडकरी (Jui Gadkari) हिची ‘ठरलं तर मग’ (Tharla Tr Mag) या मालिकेने कायमच प्रेक्षकांच्या मनावर आणि टीआरपीच्या यादीवर पहिलं स्थान पटकावले आहे.
पुढचं पाऊल या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तसेच तिने अनेक मालिका केल्या. पण सध्याची तिची ठरलं तर मग ही मालिका आणि जुईची सायली या भूमिकेने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली. जुईचं आजारपण आणि तिच्या खासगी आयुष्यामुळे ती कायमच चर्चेत असते. शिवाय तिच्या या चालू मालिकेमुळे तिच्या कामाची चर्चा तर थांबता थांबत नाहीये. पण आता सध्या जुईबद्दल वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. ती सोशल मीडियावर देखील कायमच सक्रीय असते. तिचे नवनवीन फोटो आणि तिच्या कामाच्या अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
जुई वरचेवर तिच्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. पण आता जुईने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कोणासोबत संपर्क साधला नाही तर, चांगलाच समाचार घेतला आहे. एका युजरच्या मेसेजला जुईने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे जुईची ही स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे. लोकप्रिय अभिनेत्री म्हंटल्यावर तिला चांगले वाईट असे अनेक मेसेज येत असतात. अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. पण यातही न डगमगता ते आपलं काम करत राहतात. ज्यांना जमेल त्यांना उत्तरही देतात तर कधी कधी या गोष्टींकडे दुर्लक्षही करतात.
पण यावेळी जुईला कोणत्या ट्रोलिंग संबंधित नाही तर थेट धमकीचा मेसेज आला आहे. आणि ही धमकी थेट तुरुंगात टाकण्याची आहे. ही धमकी तिला एका तरुणीकडून मिळाली आहे. त्या तरुणीने जुईला मेसेज केला की, “काय गं तुला खूप माज आलाय का? आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. तू फॉलो कर नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस कारण, आम्हाला वाटलं तू फॉलो करशील. पण, तू फॉलो केलं नाहीस आता तुला पोलिसात टाकेन…मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला, समजलं कुठेही पळायचं नाही.”
यावर जुईने देखील त्या तरुणीचा हेतू लक्षात घेऊन तिचा समाचार घेतला. तेव्हा जुई म्हणाली की, “आता झालीस तू फेमस.येच तू कर्जतला बघतेच मी पण. हे अजिबात सहन केलं जाणार नाही. थेट पोलीस स्टेशनला भेटू मग आपण.”
तर आता याबाबत जुई आणखी काही ठोस पाऊलं उचलणार का याकडेच साऱ्यांचं लक्ष लागले आहे.