लोकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. गेले अनेक वर्ष कपिल शर्मा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचा हा शो जगाच्या अगदी कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आहे. कपिलच्या या शोचे फक्त भारतातच नाही तर जगभरात लाखो करोडो चाहते आहेत. त्या सोबतच या शो मधील प्रत्येक कलाकाराचे देखील अनेक चाहते आहेत. प्रेक्षकांनी जसं या शो ला, कपिलला प्रेम दिल आहे तितकच प्रेम यामधील प्रत्येक कलाकाराला दिल आहे. आतापर्यंत अभिनय क्षेत्रापासून ते अगदी क्रिकेटर, जगातील अनेक मोठ मोठ्या व्यक्ती कपिलच्या या शो मध्ये येऊन गेल्या आहेत. या शोचे प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना खळखळून हसवते, तसेच प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक स्वतःची अशी वेगळी जागा निर्माण केली आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी हा शो बंद झाला त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज होते. पण आता पुन्हा एकदा हा शो नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी हा शो ‘द कपिल शर्मा शो’ म्हणून नाही तर ‘द ग्रेट कपिल शो’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा हा शो टेलिव्हिजन वर नाही तर ओटीटी वर म्हणजेच नेटफ्लिक्स वर आला आहे. काल ३० मार्च रोजी या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. यामध्ये बॉलिवूड मधील सगळ्यात मोठ्या घराण्यातील कलाकार मंडळी उपस्थित होती. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर, अभिनेता रणबीर कपूर आणि रणबीरची मोठी बहिण म्हणजेच रीधिमा कपूर – सहानी यांनी उपस्थिती लावली होती. यांच्यामुळे पहिला एपिसोड अगदी मज्जा मस्ती आणि हसत पार पडला.
पण यावेळीच प्रेक्षकांसाठीच आणि सर्वांसाठीच सगळ्यात मोठ सरप्राईज होत ते म्हणजचे अभिनेता सुनील ग्रोवर. या शोच्या अगदी पहिल्या एपिसोड पासून सुनील हा कपिल सोबत या शोमध्ये होता. पण मध्यंतरी एकदा विमानाने प्रवास करत असताना कपिल आणि सुनील मध्ये बाचाबाची झाली होती. त्यामुळे सुनील हा एक दोन नाही तर तब्बल ७ वर्ष या शो पासून आणि कपिल पासून लांब होता. पण त्याला परत आता शोचा भाग होताना पाहून सगळेजण प्रंचड खुश आहेत.
यंदाचा हा शो अगदी बिग बजेट शो आहे. तर यावेळी फी आकारण्याच्या बाबतीत कपिलने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला देखील मागे टाकले आहे. असं बोलण्यात येत आहे की कपिलने पाच एपिसोडसाठी जवळपास २६ कोटी रुपये आकारले आहेत. त्यामुळे कपिलने मानधन घेण्याच्या बाबतीत किंग खानला देखील मागे टाकले आहे.