बॉलिवूडमध्ये आता एकामागोमाग एक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक सिनेमांचं शूटिंग पूर्ण झालं आहे, पण काही सिनेमांचं शूटिंग सध्या सुरु आहे. आपल्या आवडत्या सिनेमाचे शूटिंग कुठे सुरु आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. आजकाल बाहेर देशात अनेक सिनेमांचं शूटिंग सर्रास होत असतं. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्दर्शक असतात ज्यांची पहिली पसंती ही भारतच असते. चांगलं लोकेशन, हिरवळ तसेच अनेक गोष्टी शूटिंगच्या बाजूने पाहिल्या जातात. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी शूटिंगसाठी परफेक्ट आहेत. महराष्ट्रातदेखील हिरवळ, डोंगर, जुन्या काळातील घरं असं असणारी अनेक ठिकाणं आहेत.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव आपल्याला माहित आहेच. कृष्णा नदीच्या काठी वसलेलं हे गाव मंदिरांसाठी आणि येथील शिवकालीन वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. येथील रस्ते, जुनी घरं, वाडे हे सगळं खूपच प्रसिद्ध आहे. पण वाई हे गाव आणखी एका कारणामुळे प्रसिद्ध आहे, ते म्हणजे सिनेमा. आत्तापर्यंत वाईमध्ये अनेक सिनेमांचं शूटिंग झालं आहे. मुंबई, पुण्यापासून जवळ आणि सुंदर ठिकाण म्हणून दिग्दर्शकांची पहिली पसंती ही नेहमीच ‘वाई’ला असते. राम तेरी गंगा मैली, ओंकारा, दबंग, चेन्नई एक्स्प्रेस, स्वदेश, गंगाजल यांसारख्या हिंदी, मराठी आणि भोजपुरी भाषांमधील जवळपास २५० चित्रपटांचं शूटिंग वाईमध्ये झालं. तसेच इथे अनेक मालिकांचे शूटिंग देखील होत असते.
तर आता पुन्हा एकदा वाईमधील कृष्णाकाठी वसलेलं प्रसिद्ध ढोल्या गणपतीचं मंदिर रोषणाईने उजळून निघाले आहे. त्याचं कारण म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा नवीन सिनेमा. रोहित शेट्टी लवकरच ‘सिंघम अगेन’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे, यामध्ये करीना कपूर खान, अजय देवगण, रणवीर सिंघ, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर हे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. या सिनेमाचं शूटिंग वाईमधील कृष्णाकाठी असलेल्या गणपतीच्या मंदिरात आणि धोम धरण या परिसरात सुरु आहे. १३ वर्षापूर्वी ‘सिंघम’ या चित्रपटाचं शूटिंग देखील इथेच करण्यात आलं होतं. आत्तापर्यंत रोहित शेट्टीने त्याच्या अनेक सिनेमांचं शूटिंग वाईमध्ये केले. सध्या सोशल मिडीयावर या सिनेमाच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये करीना कपूर आणि अर्जुन कपूर एक सीन शूट करताना दिसून आले.
हे देखील वाचा: प्रसादचं घर, हास्यजत्रेचा कल्लोळ अन् बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित पार्टीचा माहोल…
तसेच रोहित शेट्टीने शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर करत त्याखाली लिहिले की, “आयुष्य हे एका वर्तुळासारखं असत, १३ वर्षांपूर्वी, माझ्या वाढदिवशी मी गोकर्ण येथील मंदिरात सिंघमसाठी शूटिंग करत होतो आणि आज माझ्या वाढदिवशी, मी सिंघम अगेनच्या शूटिंगसाठी मंदिरात परतलो आहे! सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी धन्यवाद. #SinghamAgain”
तर आपल्या मातीत शूट झालेला बॉलिवूडचा सिनेमा पाहण्यासाठी आता प्रेक्षक देखील सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.