बॉलिवूडमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. हा सिनेमा एकाच दिवशी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाचं प्रेक्षकांकडून तसेच कलाविश्वातील अनेक मंडळींकडून भरभरून कौतुक होत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन अभिनेता रणदीप हुड्डा याने केले आहे. त्या सोबतच या सिनेमात रणदीप मुख्य भूमिकेत म्हणजेच विनायक सावरकर यांच्या भूमिकेत देखील दिसून आला आहे. २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
या सिनेमात रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अंकिता लोखंडे ही सावरकरांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसून आली आहे. या सिनेमात सावरकरांच संपूर्ण आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील राजकीय आणि वैयक्तिक सर्व घडामोडी यामध्ये अगदी योग्य पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच मराठी भाषेतील सिनेमात अभिनेता सुबोध भावे याने सावरकरांच्या भूमिकेला आवाज दिला आहे. नुकतच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर या मराठी भाषेतील सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. या स्पेशल स्क्रीनिंगला अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. प्रसाद ओक, अमृता खानविलकर, मंजिरी ओक यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यासोबतच राजकारणातील देखील अनेक मंडळी उपस्थित होते. यावेळी सगळ्यांनी अगदी भरभरून सिनेमाचं, सिनेमातील कलाकारांचं आणि खास करून रणदीपच कौतुक केलं,.
रणदीपने या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. यासाठी त्याने सावरकरांच्या आयुष्यावर भरपूर अभ्यास केला. त्याने सिनेमासाठी जवळपास २० किलो वजन कमी केले. तसेच सिनेमाच्या निर्मितीसाठी पैसे कमी पडत होते म्हणून त्याने त्याच्या वडिलांची मुंबईतील संपत्ती विकली.
या सिनेमाच्या स्क्रीनिंगला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने हजेरी लावली होती. त्याला देखील हा सिनेमा प्रचंड आवडला. या सिनेमाचं कौतुक करत त्याने सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे. सिनेमाच्या पोस्टरचा फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, “स्वातंत्र्यवीर सावरकर, अप्रतिम सिनेमा! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी. अतिशय संयत अभिनय. उत्तम पटकथा. देखणं छायाचित्रण. परिणामकारी पार्श्वसंगीत. रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीम चं मनःपूर्वक अभिनंदन…!!! सिनेमा आता “मराठीत” सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र सुबोध भावे यांनी सावरकरांना आवाज दिलेला आहे. कोणत्याही खोट्या पोस्ट कडे लक्ष देऊ नका. सिनेमा उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्तानी पुन्हा एकदा “सावरकरांना” त्रिवार वंदन…!!!! जय हिंद…!!!”
या सिनेमाचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पण अनेकांनी यावर आक्षेप देखील घेतला आहे.