प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणजेच ‘प्रशांत दामले.’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रशांत दामले हे नाव अत्यंत लोकप्रिय आहे. साडेतीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी असंख्य मराठी नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले हे नावाजलेलं नाव. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावावर ५ लिम्का बुक रेकॉर्ड देखील आहेत. नाटकाचं महत्त्व टिकवून ठेवणाऱ्या काही मोजक्या कलाकारांच्या यादीत प्रशांत दामले यांचे नाव हे सर्वात आधी घेतले जाते. प्रशांत एक उत्तम अभिनेते व गायक तर आहेतच पण त्याच बरोबर ते एक उत्तम निर्माते देखील आहेत.
प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या नाट्यमय प्रवासाबद्दल काहीही गोष्टींचा खुलासा केला आहे. या मुलाखती दरम्यान प्रशांत दामले म्हणाले की, “२७ डिसेंबर १९८५ ला माझं लग्न झालं, १९८६ मध्ये मी माझं पहिलं ‘ब्रह्मचारी’ हे नाटक केलं. एकतर माझी पत्नी गौरीचा माझ्यावर असलेला विश्वास खूप महत्त्वाचा आहे. १९८७ मध्ये मला पहिली मुलगी झाली अन् १९९२ ला दुसरी मुलगी झाली. त्याचवर्षी मी नोकरी सोडली. त्याआधी ५ वर्ष बेस्टमधून मी सुट्टी घेऊन नाटक करायचो, या पाच वर्षांत आपण कसे जगलो याचं मी अन् माझ्या पत्नीने गणित मांडलं. माझ्या पगाराशिवाय आपण घर चालवू शकतो का याचा अंदाज घेतला.”
पुढे पत्नी आणि घराविषयी बोलताना ते म्हणाले की, “मला आठवतंय साधारणपणे गौरी ८५० रुपयांत घर चालवायची आणि कुठेही काही कमी नसायचं, तक्रार नसायची. मला पहिली नाइट २५ रुपये मिळाली होती, त्यानंतर ७५ रुपये झाली. विश्वास आणि व्यवस्थापन यामुळेच हे सगळं शक्य झालं. १९९२ ला जेव्हा ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाला पहिला हाऊसफूलचा बोर्ड लागला तेव्हा मी गौरीशी बोललो की आता बेस्टमध्ये आपली जागा फार काळ अडवून ठेवण्यात काही अर्थ नाही. माझ्याजागी तिथे दुसऱ्याला नोकरी लागू शकते, आता या नाटकावर आपण पुढे जाऊ शकतो, तेव्हा तिनेही मला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मी नोकरी सोडून फक्त नाटकावर लक्षकेंद्रित केलं.”
तसेच प्रशांत दामले म्हणाले, “मी फक्त नाटकात काम करत होतो, अभिनय करत होतो, पण घर सांभाळणं हे खूप कठीण काम आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत घरातील स्त्री असंख्य कामं करते. टाइम मॅनेजमेंट ही स्त्रियांकडे उपजत असते. त्यात जर डोंबिवलीहून प्रवास करत मुंबईला नोकरी करणारी स्त्री असेल तर मला तिचे पायच धरावेसे वाटतात. इतकी वर्षं माझ्या शेड्यूलप्रमाणे माझ्या पत्नीने तिचं आयुष्य अॅडजस्ट केलं. तिने कोणत्याही समस्या माझ्यापर्यंत येउच दिल्या नाहीत.”
अनेक आव्हानांना सामोरे जात प्रशांत दामले यांनी मराठीमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आज नवोदित कलाकारांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.